Tuesday, January 31, 2023

खंडणी देण्यास नकार देताच केला कात्रीने हल्ला

- Advertisement -

औरंगाबाद | कामगार चौकातील मेडिकल दुकानदारासह ग्राहकांकडून खंडणी उकळण्यासाठी थेट कात्रीनेच हल्ला केल्याची घटना 11 जुन रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कृष्णा दगडू जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक कृष्णा जाधव कामगार चौकातील देवगिरी मेडिकल वर आला. त्याने दुकानावर आलेल्या ग्राहकांना शिवीगाळ करून दारू पिण्यासाठी पाचशे रूपयांच्या खंडणीची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.

- Advertisement -

सिडकोतील अंगद राधेश्याम वेताळ (25 चिश्तिया कॉलनी) हा कामगार चौकातील अशोक मोहन तपसे यांच्या देवगिरी मेडिकलवर कामाला आहे. कृष्णा या मेडिकल वर आला असता त्याने ग्राहकांवर आणि मेडिकल चालकावर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काऊंटरवरील गोळ्यांचे बॉक्स आणि कॉम्प्युटरचा कीबोर्ड फेकत तोडफोड केली. अंगद वेताळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत आहे.