लाखो लोक भुकेच्या दारात असताना खायला २ घास देणारा कधीही मोठा असतो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आठ नऊ वर्षे झालीत त्याला,घरून पुण्याला येत होतो,रूमवर काय काय पाहिजे ते साहित्य आई बॅगेत भरत होती..शेवटी डबा भरायला लागली,चपाती आणि बहुतेक बेसणची पोळी/दामटी केली होती न्यायला.आईला म्हटलं,”तीन चपात्या बास झाल्या..” आई म्हणतं होती,”पाच चपत्या देते,घेवून जा..भूक जास्त लागली तर खाऊन घेशील नाहीतर रूमवर पोहचल्यावर खाशील उशीरा..” मी जरा तणतणतचं बोललो,”तीनच चपात्या दे..जास्त अजिबात नको…” आवरलं सारं आणि घरून निघालो.गावातनं शिराळा मग इस्लामपूर आणि मग सांगली-पुणे एशियाडने प्रवास सुरू झाला.

सातारच्या मागे पुढे बसं एका धाब्यावर थांबली.कंडक्टर अगोदरच बोलले होते,”पंधरा वीस मिनीट बस थांबणार आहे..” गाडीतली माणसं जरा सैलावली होती.मी पण हॅाटेलच्या एका कोपर्यात सॅक घेवून बसलो..आणि आजूबाजूला जरा बघत घरून दिलेला डबा काढून खायला सुरूवात केली लक्षात आलं की आईने डब्यात तीन नाही तर पाच चपात्या दिल्या आहेत,परत थोड़ी चिड़चिड़ झाली पण आता डबा खाण्याशिवाय पर्याय नव्हता.

चार पाच मिनीटांतच एक आजी,एक तीन चार वर्षाच बाळ व त्याची आई माझ्या समोरच टेबलच्या दुसर्या बाजूला येवून बसले,त्यांनी घरून आणलेली पाण्याची बाटली काढली व एक एक घोट पाणी प्यायला लागल्या पण ते बाळ सारखं रडतं होतं.बाळाची आई व आजी त्याला शांत करायला बघत होत्या पण ते शांत होत नव्हतं.मी विचारू का नको करत करत शेवटी विचारलं,”काय झालं का रडतोय तो..?” तर आजी का आई बोलली,”भूक लागलीय त्याला..” म्हटलं मग,”द्या की काहीतर खायला त्याला..” तर समोरून परत उत्तर आलं,”आमच्याकडे गाडीचं फक्त पैसे होते आणि खायला वगैरे द्यायला काही पैसे नाहीत….” उत्तर ऐकून दोन मिनिट मी सुन्न झालो.त्यांना म्हटलं,”माझ्या डब्यात जेवण आहे.दोन चपात्या जास्त आहेत देता का बाळाला..?” त्या आजी,मुलाची आई नको नको म्हणत असताना मीच जेवण घ्यायचा आग्रह केला शेवटी त्यांना डब्यातल्या चपात्या व दामटी दिली व बसमधे येवून सुन्न होवून मी बराच वेळ बसलो पण एक समाधान होतं की आज डब्यात पाच चपात्या होत्या,आज पण ही घटना आठवली की अस्वस्थ होतो,आयुष्यात त्यानंतर परत कधी घरून जेवण देत असतील तर येवढचं जेवण द्या सांगायचं धाडस पण झालं नाही,जे,जेवढे देतील ते सोबत घेत असतो..

असे आजपण अनेकजण आहेत ज्यांना एक रूपया बैलगाडीच्या चाकायेवढा मोठा वाटतो आणि जेवायला एक भाकरीचा चतकोर चंद्रकोरीसारखी अप्राप्य वाटतो.

लॅाकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळी मोफत देणार म्हटल्यावर अनेकांनी स्विगी,झोमॅटोवर ती मिळणार का? वगैरे कुत्सित शेरेबाजी सुरू केली. कसं आहे तुम्ही, मी सुस्थितीत आहोत, आपल्याला पोटभर जेवायला मिळतंय पण याचा अर्थ असा नाही होत की बाक़ी सगळे आपल्यासारखेच आहेत. टीका करायला हजार विषय आहेत की आपण भुकेल्यांना मदत करू शकत नसू तर किमान भुकेल्यांची, गरजवंतांची आपल्याकडून टिंगल टवाळी होवू नये याचं तरी भान ठेवलं पाहिजे राजे हो. बाकी हजारो लोक मरणाच्या दारात उभे असताना रिकाम्या ताटं वाट्या वाजवायला सांगणार्यापेक्षा गरीबीला दोन घास देणारा कधी पण मला मोठा वाटतो ..!!

– शरद पाटील यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

( मूळ फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा )