हजारोंची लाच घेताना ग्रामसेवक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – ग्रामपंचायती अंतर्गत गावात बसवलेल्या पेव्हर ब्लॉकचे बिलाचा धनादेश देण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या ग्रामसेवक वसंत सिताराम इंगळे (42) याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला अटक केली.

तक्रारदार कंत्राटदाराने वैजापूर तालुक्यातील नेम गोंदेगाव येथे पेवर ब्लॉक बसवले. त्या बिलाचा धनादेश मात्र त्याला देण्यात ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ करण्यात येत होती. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांनी शहानिशा केली असता, इंगळे 40, हजारांची लाच मागत असल्याचे स्पष्ट झाली.

सापळा रचून मागणी केलेल्या रकमेतून पाच हजार कमी करून त्याने 35 हजार रुपयांची लाच घेतली. तेव्हाच दबा धरून बसलेल्या निरीक्षक सूर्यवंशी यांच्यासह अंमलदार सुनील पाटील, नागरगोजे व सी.एन. बागुल यांच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले.