व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जरांगेंनी उपोषण सोडत्यावेळी अजित पवार- देवेंद्र फडणवीस का हजर नव्हते? चर्चांना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज सतराव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपले उपोषण मागे घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे यांनी उपोषण मागे न घेण्याची ठाम भूमिका मांडली होती. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी आंदोलनास्थळी जाऊन त्यांची समजूत काढून उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. परंतु या सगळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपोषणस्थळी जाणे टाळले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

मनोज जरांगे यांनी सरकारपुढे पाच महत्त्वाच्या अटी ठेवल्या होत्या. यातील पहिली हाट मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची होती. तर दुसऱ्या अटीत त्यांनी म्हटले होते की, उपोषण सोडत्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ हजर असावे. परंतु आज मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले मात्र त्यावेळी फक्त एकनाथ शिंदेच हजर होते. यामुळे आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी का गेले नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर अनेक वेगवेगळी कारणे देण्यात येत आहेत.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस न आल्याची कारणे

मुख्यमंत्री यांनी जालना जाण्याचा निर्णय तातडीने घेतला त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या बैठकास सोडून मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी जाता आले नाही असे म्हटले जात आहे. तसेच, अजित पवार यांच्या नियोजित बैठकांचं अगोदरच आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे देखील त्यांना उपोषणस्थळी हजर राहता आले नाही असे देखील सांगितले जात आहे. तर दुसरीकडे सध्या देवेंद्र फडणवीस राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानमध्ये देवेंद्र फडणवीस पाच प्रमुख महत्त्वाचे कार्यक्रम पार पाडणार आहेत. यामुळेच त्यांना जरांगे यांच्या भेटीसाठी येता आले नाही.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असल्यामुळे ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढतील असे म्हटले जात होते. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार देखील मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी हजर होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र या दोघांऐवजी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जरांगे यांना भेटण्यासाठी गेले होते. जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधल्यानंतरच आपले उपोषण मागे घेतले आहे. आज एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत, माजी मंत्री अर्जुन खोतकर अंतरवाली सराटीत उपस्थित होते.