व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नवरात्रोत्सव का साजरा करतात?? काय आहे यामागील इतिहास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवाचे दहा दिवस सरले की लोकांना नवरात्रीचे वेध लागतात. महाराष्ट्रात गणेशोत्सव प्रधान आहे त्यामानाने नवरात्र हे मोठ्या प्रमाणात सादर होत नाहीत. पण नवरात्रीच्या निमित्ताने सादर होणारा गरबा आता सगळीकडेच पोहोचला आहे. त्यामुळे नवरात्रीचेही आकर्षण लोकांमध्ये वाढत आहे. देशाच्या विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्री साजरी केली जाते. त्यांत पश्चिम बंगालमध्ये याचं पारंपरीक रुप पहायला मिळतं तर गुजराथमध्ये गरबाच्या माध्यमातून आलेलं आधुनिक रुप दिसतं.

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. राम, कृष्ण, दत्त, खंडोबा इ. देवतांचेही नवरात्र-उत्सव असतात परंतु देवीच्या शारदीय नवरात्राचा उत्सव भारताच्या बहुतेक सर्व भागांत रूढ आहे. नवरात्राचा उत्सव हा एक कुलाचारही असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येते. दुर्गा किंवा काली ही ज्याप्रमाणे ब्राह्मणांची कुलदेवता आहे, त्याप्रमाणे अनेक क्षत्रियांचीही कुलदेवता आहे. देवीच्या देवळातून सार्वजनिक रीतीने हा उत्सव केला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. लहानशा मातीच्या ढिगावर गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. कित्येक ठिकाणी घटावर तांत्रिक यंत्राचीही स्थापना करतात. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालणे इ. विविध आचार वेगवेगळ्या कुळांत पाळले जातात.

दुर्गा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांशी नऊ दिवस युद्ध केले व त्यांचा वध केला. म्हणून हा नवरात्राचा उत्सव केला जातो. विजयादशमी हा तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नवरात्रोत्सवातील अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी दुर्गेची महालक्ष्मीस्वरूपात पूजा करतात. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही दुर्गेची तीन महत्त्वाची रूपे आहेत. बंगालमध्ये काली देवीचे उपासक अधिक आहेत त्यामुळे तेथे हा नवरात्र-उत्सव विशेष प्रकारे साजरा केला जातो. या उत्सवास दुर्गापूजा वा पूजा-उत्सव म्हणतात. नवरात्रोत्सवाची समाप्ती नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी करतात. कित्येक ठिकाणी भाद्रपद वद्य अष्टमीपासूनही या उत्सवास सुरुवात होते.

चपई नृत्य हा कोकणातील धनगर जातीचा प्रमुख नृत्य प्रकार आहे. नवरात्रीत देवीची घटस्थापना झाल्यानंतर देवीसमोर हे नृत्य खेळले जाते. तसेच दसऱ्यादिवशी सीमोल्लंघनाला धनगरांचे देव सीमेवर जातात तिथे मांड भरला जातो आणि त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हे नृत्य खेळले जाते. चपई हा विधीनृत्य प्रकार असल्याने यातील खेळगडी हे धनगर जातीतीलच असतात. खेळ खेळता खेळता एखाद्या खेळगड्याच्या किंवा भक्तांच्या अंगी दैवी संचार होऊन ते घुमू लागतात.

नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंत आणि दिवाळी या सणांना हे नृत्य केले जाते. देवतांना केलेल्या नवसाची परतफेड म्हणूनही चपईनृत्य खेळविले जाते त्याला पवा खेळविणे असे म्हणतात, चपई नृत्य खेळत असताना “हार हार चांग भलं” आणि “भली ग भली ग व्हयी” असा जयघोष सुरु असतो. प्रथम संथ लयीत चालणारे हे नृत्य हळूहळू द्रुततलय पकडते आणि मग खेळगड्यांची चपळता दिसून येते. चपई खेळणारे खळगडी अंगात पायगोळ झगा घालतात. डोक्याला फेटा बांधतात. कमरेला कमरबंध / कमरशेला बांधतात. हातात वेताची छडी आणि पायात वाक्या असतात. कपाळाला भंडारा लावतात. डोक्यास फेटा / पागोटे बांधल्याखेरीज कोणीही खेळगडी खेळत नाही. महाराष्ट्राच्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच गोवा राज्य आणि कारवार प्रांतात वास्तव्य करून असलेला धनगर समाज हे नृत्य सादर करतो.

– प्रतिक पुरी

(माहिती संदर्भः मराठी विश्वकोश)