सातारा- देवळाईवर मनपाचा अन्याय का ? आमदार संजय शिरसाट यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सातारा परिसरातील विकासाच्या कामांसाठी निधीवाटपात अन्याय होऊ देणार नाही. जनहितासाठी व विकास कामांसाठी आपला आग्रह कायम राहील, अशी ग्वाही आमदार संजय शिरसाट यांनी दिली. रविवारी सातारा परिसरातील द्वारकादास नगर, अथर्व क्लासिक येथील सिमेंट रस्त्याचे उद्घाटन व अबरार कॉलनी येथील भूमिगत गटारीचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना आमदार शिरसाट म्हणाले, माझा पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मोठ्या प्रमाणात व्यापला आहे. त्यामुळे या भागाचा विकास केवळ आमदार निधीतून होत नाही तर वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करून सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणावा लागतो. आपली महापालिका आतापर्यंत सातारा-देवळाईचा विकास करू शकली नाही. मागच्या वेळी राज्य शासनाने मनपाला 80 कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र पश्चिम मतदारसंघाच्या विकासकामासाठी त्यापैकी फक्त अडीच कोटींचा निधी मनपाने दिला. असा अन्याय का? याचा जाब मी विचारला. सातारा देवळाईच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेऊन 350 कोटी मंजूर केले. तो सर्वच निधी याच भागासाठी वापरायला हवा. या भागातील जास्तीत जास्त रस्ते या निधीतून व्हावेत, यासाठी माझा पाठपुरावा असेल, असे आश्वासन शिरसाट यांनी दिले.

अबरार कॉलनी येथील भूमिगत गटार योजनेचे उद्घाटन करताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, या भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी प्रसंगी अतिरिक्त निधी आणावा लागला तर तोदेखील सरकारकडून आणण्याची माझी तयारी आहे. इथले लोक महापालिकेचे सगळे कर भरतात. मग सोयी-सुविधांबाबत त्यांना सापत्न वागणूक का, असा सवालही शिरसाट यांनी याप्रसंगी उपस्थित केला.

Leave a Comment