फडणवीसांच्या काळात रझा अकादमीवर बंदी का घातली नाही? राऊतांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती हिंसाचारानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. दरम्यान, हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारनं रझा अकादमीवर बंदी घालावी, असं आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांच्या काळात रझा अकादमीवर बंदी का घातली गेली नाही? असा सवाल त्यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फडणवीसांचं सरकार असतानाही राज्यात असे काही प्रकार घडले होते. तेव्हा त्यांनी रझा अकादमीवर बंदी का घातली नाही? महाराष्ट्राला कायद्याच्या राज्याची परंपरा आहे. इथं चेहरा पाहून कारवाई होत नाही. मुख्यमंत्री व गृहमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतीलच, असं राऊत म्हणाले.

अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली, कोणत्या कारणाने पेटवली, त्यामागे कोण होतं हे देशालाही माहिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहिती आहे आणि अमरावतीमधील जनतेलाही माहिती आहे. वातावरण सगळं शांत झालं असताना उगाचच काड्या करण्याचं काम ना इकडल्यांनी, ना तिकडल्यांनी कोणीही करू नये एवढंच मी महाविकासआघाडीतर्फे त्यांना आवाहन करेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला.