पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहित महिलेने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

अजित प्रताप सिंग असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे. अजित हा गेल्या काही महिन्यांपासून पत्नीला सतत मारझोड करत होता. अगदी क्षुल्लक कारणावरून तो पत्नीला मारहाण करायचा. या आरोपी अजितच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. मृत महिलेचे आरोपी पती अजित प्रताप सिंग याच्यासोबत 10 जानेवारी 2007 लग्न झाले होते. आरोपी अजित हा मृत महिलेच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. मैत्रीच्या नात्यातून हे लग्न जुळलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षात आरोपी अजित सिंग याने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली.

आरोपी अजितचे अन्य एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे या दोघा पती-पत्नीत नेहमी वाद व्हायचे. याच वादातून अजित आपल्या पत्नीला मारहाण करत असे. पतीचे बाहेर सुरू असलेले अनैतिक संबंध आणि सततची होणारी मारहाण यामुळे पीडित महिला सतत चिंतेत असायची. याच चिंतेतून तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.