Sunday, June 4, 2023

कोरोनाने हिरवलेल्या पतीच्या निधनाने पत्नीची आत्महत्या

औरंगाबाद | कोरोनाने पतीचे निधन झाले. यामुळे पतीच्या जाण्याचे दुःख सहन न झाल्याने महिलेने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. ही घटना बीड बायपास परिसरातील सुमित्रा पॅराडाईज येथे घडली. रुपाली किशोर देशमुख, वय 34 असे मृत विवाहितेचे नाव आहे.

रूपाली यांचे पती इंदूरला नोकरीला होते मागील लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे किशोर देशमुख यांना रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रूपाली या चार वर्षाच्या मुलीसह आई-वडिलांकडे राहत होत्या. पतीचे जाण्याचे दुःख सहन न झाल्यामुळे त्या पूर्णतः खचल्या होत्या.

बुधवारी आईवडील घराबाहेर गेल्यानंतर रूपाली यांनी दरवाजाला आतून कडी लावून घेत पंख्याला ओढणीने गळफास घेतला. घरी परतलेल्या आई-वडिलांनी आवाज दिल्यानंतर ही रूपाली दरवाजा उघडत नसल्याचे पाहून त्यांनी शेजाऱ्यांना बोलवत दरवाजा तोडला. तेव्हा रूपाली यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. बेशुद्ध झालेल्या अवस्थेत त्यांना घाटी येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून रूपाली यांना मृत घोषित केले. याबाबत सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.