4 लेकरांच्या आईचे 6 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाबरोबर झेंगाट, मात्र एका शर्टामुळे…

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – आपण अनेकदा ऐकतो प्रेम आंधळे असते अन् प्रेमाला वय नसतं पण ठाण्यातील भिवंडीमध्ये या गोष्टीचा प्रत्यय आला आहे. 4 लेकरांची आई असेलेली महिला आपल्यापेक्षा सहा वर्षाने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली. या प्रेम संबंधामध्ये आपल्या पतीचा अडथळा येत होता म्हणून तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने जंगलात नेऊन पतीची हत्या केली. इतकेच नाहीतर तिने मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा विद्रुप केला. मात्र गुन्हेगार कितीही शातीर असला तर कोणती ना कोणती चूक नक्कीच करतो. पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टावरून मृतदेहाची ओळख पटवली आणि त्याची हत्या करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

काय आहे नेमके प्रकरण ?
4 जानेवारी रोजी भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खारबाव रेल्वे स्टेशन परिसरातील जंगलात एक व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या तसेच चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. चेहरा विद्रुप केल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला तेव्हा मृतदेहाच्या शर्टावरील आयान फॉर मेन्स टेलर्स हा मार्क आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीत या नावाने टेलर्स दुकानाचा शोध घेतला. तेव्हा बागे फिरदोस या भागात हे दुकान आढळून आले. त्याच्या मदतीने शर्टाची मग मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. हा मृतदेह विठ्ठल नगर येथील सलाउद्दीन मोहम्मद युसूफ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेहाच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.

यानंतर पोलिसांनी स्थानिकांकडे चौकशी केली तेव्हा त्याच इमारतीमध्ये राहणारी असजद अन्सारी ही व्यक्ती मृतदेहाच्या दफनविधी प्रसंगी हजर नव्हती. ही बाब पोलिसांना खटकली आणि त्याचा शोध घेतला असता तो पसार झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला नारपोली परिसरातून अटक केली. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. आरोपी असजद अन्सारी या विवाहित व्यक्तीचे मृत व्यक्तीच्या 38 वर्षीय पत्नीसोबत मागील सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये पतीचा अडसर होत होता. यामुळे मृत व्यक्तीची पत्नी आणि आरोपी प्रियकराने त्याला मारण्याचा कट रचला.

मृत सलाउद्दीन मोहम्मद युसूफ याला लघवीचा त्रास होत असल्याने खारबाव येथील ग्रामीण भागात त्यावर गावठी औषध मिळते, ते घेण्यासाठी पत्नीने त्याला गळ घातली. त्यानंतर दोघे गेले असता त्या ठिकाणी आधीच येऊन थांबलेल्या प्रियकराने धारदार शस्त्राच्या सहाय्याने सलाउद्दीन याची गळा चिरून हत्या केली. यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तोंडावर दगडाने वार करत चेहरा विद्रुप केला. भिवंडी तालुका पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस पथकाने कसून तपास करत आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अवघ्या दोन दिवसांत अटक केली.