घर विकले बापाने आणि जीव घेतला लेकाने; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात एका दाम्पत्याने एका महिलेला अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीमध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दाम्पत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटकदेखील करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लता श्रीकांत माने असं मृत पावलेल्या 47 वर्षीय महिलेचं नाव असून त्या पुण्यातील वारजे परिसरातील हिंगणे होम कॉलनी परिसरात राहायला आहेत. वृषाली तानाजी बोडके आणि तानाजी नथू बोडके असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दाम्पत्याचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तानाजी बोडके याला अटक केली असून अधिक चौकशीनंतर आरोपी वृषाली बोडकेलादेखील अटक होण्याची शक्यता आहे.

मृत लता माने यांनी काही दिवसांपूर्वी आरोपी तानाजी बोडके यांच्या वडिलांकडून घर विकत घेतलं होतं. पण विकत घेतलेलं घर खाली कर, असा तागादा आरोपी दाम्पत्याने केला होता. पण विकत घेतलेलं घर का सोडायचं? यामुळे लता यांनी घर सोडायला नकार दिला. याच रागातून आरोपी दाम्पत्यांने मृत लता माने यांना मारहाण केली. या मारहाणीत लता माने गंभीर जखमी झाल्या होत्या. यानंतर लता माने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लता यांच्या ओळखीच्या सोनिया ओव्हाळ यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.