पोलिसाने ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या महिलेकडून करून घेतली मसाज

पाटणा : वृत्तसंस्था – बिहार पोलिसांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बिहारच्या सहरसा येथील नौहट्टा पोलीस स्टेशनमधील हा व्हिडिओ आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेकडून मसाज करून घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नौहट्टा पोलीस ठाण्याचे एसएचओ शशी भूषण सिन्हा महिलेकडून तेलाची मालिश करून घेताना दिसत आहे. तर त्याच्या शेजारी आणखी एक महिला खुर्चीवर बसलेली दिसत आहे.

तसेच या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी फोनवर वकिलाशी बोलतानाही ऐकू येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मसाज करणारी महिला आपल्या मुलाला तुरुंगातून सोडवण्यासाठी आली होती. त्यानंतर एसएचओने मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्याचं आश्वासन देऊन महिलेला तेलाची मालिश करून देण्यास सांगितले. मसाज करतानाचा व्हिडिओ उत्कर्ष सिंग नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर निरनिराळ्या कमेंट येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं, ‘दररोज जाणवतं की गंगाजल हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे.’ सूरज त्रिपाठी नावाच्या युजरने लिहिलं – बिहार सरकार अजूनही झोपेत असेल? रुबिना नावाच्या युजरने विचारलं की असे व्हिडिओ पाहून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लाज वाटते का? हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणी एसपींनी इन्स्पेक्टरला निलंबित केलं आहे.