मुख्याध्यापकाचे महिलेसोबत विकृत कृत्य; काम असल्याचं सांगत शाळेत बोलावलं अन्…

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने एका महिलेला शाळेत बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले आहेत. या आरोपी मुख्याध्यापकाने शाळेत काम असल्याचे सांगून पीडितेला शाळेत बोलावून घेतले. यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून या मुख्याध्यापकाने पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पोलीस ठाण्यात धाव घेतली.

रुस्तम रामभाऊ होनाळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. आरोपी होनाळे हा नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक कन्या शाळेवर मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. या पीडित महिलेच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप आरोपी शिक्षकाला अटक केली नसून पुढील तपास सुरु केला आहे.

हि पीडित महिला याच शाळेत शालेय पोषण आहार बनवण्याचं काम करते. घटनेच्या दिवशी शाळेत कुणीही नव्हतं. याचा फायदा घेऊन आरोपीनं शाळेत काम असल्याचं सांगून पीडित महिलेला बोलावून घेतले. काही कार्यलयीन काम असेल म्हणून पीडित महिला शाळेत गेली होती. यावेळी शाळेत कुणीच नसल्याचा फायदा घेत आरोपीनं पीडितेशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यानंतर घाबरलेल्या फिर्यादी महिलेने कशीबशी आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि थेट नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेमुळे शाळा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

You might also like