दारूविक्रेत्या महिलेला मुक्तिपथने सिनेस्टाइल पकडले, वाचा नक्की काय आहे प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक

अनेक वर्षांपासून निडरपणे दारूविक्री करणाऱ्या वासाडा येथील महिलेला देशी दारूच्या मुद्देमालासह मुक्तिपथ गाव संघटनेच्या सदस्यांनी रंगेहात पकडले. निशा मेश्राम असे दारूविक्रेत्या महिलेचे नाव आहे. खासगी वाहनातून ही महिला दारूची वाहतूक करीत होती. आरमोरी पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

वासाडा येथील निशा मेश्राम ही अनेक वर्षांपासून दारूविक्रीचा व्यवसाय करीत आहे. या गावात मुक्तिपथ गाव संघटनेने दारूविक्री बंदीचा ठराव घेतला आहे. ही दारुबंदी टिकून राहण्यासाठी गाव संघटन प्रयत्नशील आहे. असे असतानाही अनेक वर्षांपासून ही महिला दारूची विक्री करीत होती. अनेकदा तिला याबाबत समज देण्यात आली. तिच्याविरोधात तक्रारीही करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर तडीपारीची कारवाई करण्यासाठीही प्रस्ताव तयार करण्यात आला. असे असतानाही कधी चोरून लपून तर कधी उघडपणे तिची दारूविक्री सुरूच होती.

मंगळवारी सदर महिला दारूच्या निपा खरेदी करण्यासाठी आरमोरीला आल्याची माहिती मुक्तिपथ चमूला मिळाली. यावरून तिच्यावर पाळत ठेवली असता एका विक्रेत्याकडून तिने दारूच्या १६० निपा खरेदी केल्या. तिचा नवराही यावेळी सोबत होता. हा मुद्देमाल घेऊन ती वासाडा कडे जाणाऱ्या एमएच ३३ ए १८६१ या वाहनात बसली. दरम्यान ठाणेगाव ला तिचा नवरा उतरला. मुक्तिपथ तालुका चमूने ही माहिती वासाडा येथील गाव संघटनेच्या सदस्यांना दिली. येथील तंमुस अध्यक्ष रामदास जांजरकर, व्यसनमुक्ती समिती अध्यक्ष हंसराज धंदरे आणि गाव संघटनेचे १६ सदस्य वाहनाला अडविण्यासाठी रस्त्यावर येऊन थांबले. गाडी वासाडा येथे येताच ती अडवून सर्व प्रवाशांना खाली उतरवून या महिलेजवळील साहित्य तपासले असता १६० देशी निपा आढळल्या. ताबडतोब आरमोरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याच दरम्यान महिलेने गाव संघटनेला तक्रार न करण्यासाठी पैशाचे आमिषही दाखविले. पण कुठल्याही आमिषाला बळी न पडता गाव संघटनेने महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच ‘यानंतर दारू विकणार नाही’ असे शपथपत्रही तिच्याकडून लिहून घेतले. आरमोरी पोलिसांनी सर्व माल जप्त करून महिलेस अटक केली.

Leave a Comment