महिला दिन विशेष | पुण्याची आण-बाण-शाण आणि अभिमान वगैरे असणाऱ्या शनिवारवाड्यापासून पुढे चालत गेलं की अप्पा बळवंत चौक लागतो. तिथं पुस्तके मिळतात. अर्थातच अभ्यासाची. तिथे पुस्तकाची खूप दुकाने आहेत. तशी ती सगळीकडेच असतात पण इथे जरा जास्तच. तेथून थोडं पूढे गेलं कि श्रीमंतांचा सोनेरी सोनेरी दगडूशेठ हलवाई गणपती लागतो. तिथं नतमस्तक व्हायचं. म्हणजे तसा काही नियम नाही पण मागच्या चौकताला सिग्नल तोडून आलेला माणूसही आपलं जे काही दोन-चार चाकांचं वाहन असेल ते सावकाश करून मान झुकवून बाप्पाच्या पाया पडून पुण्य पदरात पाडून घेतो. आपल्या चांगल्या- वाईट कर्मांची शुद्धी करून पुढे गेलं की डाव्या हाताला एक रस्ता जातो. रस्ता तसा उजविकडेही जातो पण आपण डावीकडेच जायचं. कारण तिकडे गर्दी असते. गर्दी तशी तर सगळीकडेच असते. गावाकडे नसते. असो…तर आपण डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे जायचं. तिकडे बुधवार पेठ आहे.
आपण डावीकडे-उजवीकडे पाहायचं आणि पुढे चालायचं. तिथे जीर्ण झालेल्या साडीच्या पदरासारख्या मध्यम उंचीच्या इमारती आहेत. जाळी लावलेल्या पिंजऱ्यासारख्या. त्या इमारतींचीही गर्दीच आणि त्या इमारतीमध्येही गर्दीच. हि गर्दी स्त्री-पुरुषांची. सगळीकडे असते तशीच. पण इथे एक फरक आहे. इथे एका गर्दीचा दुसऱ्या गर्दीबरोबर व्यवहार चालतो. म्हणजे आपण दुकानात एखादी वस्तू घेताना जसा व्यवहार करतो अगदी तसाच. तर अशी ही चेहरा नसलेली अनोळखी गर्दी. तिथे गेल्यानंतर आपणही तिथल्या अनोळखी गर्दीचा अनोळखी चेहरा होऊन जातो. असं म्हणतात की इथे काही लोकांनां(म्हणजे पुरुषांना) सुख विकत मिळतं…काहींची भूक भागते(पोटाची नव्हे)…काहींना मज्जा वाटते…काहींना क्षणिक आनंद मिळतो तर काहींना उगीचच शून्य वाटतं. इथल्या गर्दीचं अजून एक वैशिष्ट. इथल्या एका गर्दीला बाहेच्या जगात एक ओळखीचा परिचित चेहरा आहे. पण एका गर्दीकडेे “आधार कार्डही” नाही. इथली एक गर्दी नेहमीच बदलत असते आणि एक गर्दी वर्षानुवर्षे तीच आणि तिथेच असते. या गर्दीचे मुक्काम-पोस्टही तेच. बाहेर उजळ माथ्याने वावरणाऱ्या इथल्या एक गर्दीने मनातल्या मनात का होईना स्वतःची काळी सावली पाहिलेली असते आणि दुसऱ्या गर्दीने बुरखा घातलेल्या उजळ माथ्याच्या समाजाचा चेहरा ओळखलेला असतो.
या रस्त्याने जाताना अजिबात किळसवानं वगैरे वाटत नाही पण नेहमी शून्य वाटतं. गोठलेल्या बर्फासारखं.. एकदम बधिर. जगाचं माहित नाही पण भारतात या गर्दीची लोकसंख्या सात लाख आहे असं रिपोर्ट सांगतो. आणि दररोज हजारो निरपराध मुली या गर्दीत ढकलल्या जातात. त्याची कारणे अनेक असू शकतात पण “स्त्री” ची पूजा होणाऱ्या या महान देशात हे होतं हेही अभिमानास्पद. नाही का.?. इथल्या गर्दीचं आयुष्य फार फार तर ४० वर्षे. त्यानंतर….त्यानंतरचं माहित नाही. इथल्या गर्दीला वयाची मर्यादा असते. स्वातंत्र्याचे आणि स्वावलंबनाचे इथले नियम वेगळे असतात. मानवी हक्क, अधिकारवाल्या लोकांना इकडचा रस्ता माहित नाही. युनोच्या ऑफिस पासून ते येडशी बुद्रूकाच्या ग्रामपंचायतीपर्यंत स्त्री सक्षमीकरणाचे ढोल बडविले जातात आणि कोट्यवधी रुपये ओतले जातात. परंतु इथल्या या महिलांच्या सबलीकरणासाठी काय केलं जातं हे बाप्पालाच माहित.
रिपोर्टनुसार प्रत्येक ३० मिनिटाला एका स्त्री/मुलीवर बलात्कार होतो. मग आपण त्याचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढतो. मेणबत्या पेटवतो. सोशल मीडिया वर #JusticeFor… असे हॅश-टॅग चालवतो. असं केल्याने जाम भारी वाटतं. गुडलक हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पित असताना स्लीवलेस घातलेल्या पोरीकडे चोरून- चोरून पाहिल्याच्या पापातून मुक्ती मिळविली असं वाटतं. तसे आपणही गर्दीतलेच. ती स्लीवलेस घातलेली पोरगी पण गर्दीतलीच. आपल्या गर्दीत आणि त्या जाळी लावलेल्या जीर्ण इमारतीतील्या गर्दीत फरक असतो. आपली गर्दी म्हणजे नैतिक आणि सुसंस्कृत. तिकडची गर्दी म्हणजे समाजाला “कलंक” वगैरे. आपल्या गर्दीतील एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर पुन्हा आपण मोर्चे,मेणबत्या, हॅश-टॅग सर्वकाही करणार. गल्ली ते दिल्लीपर्यंत आवाज उठवणार. वर्तमानपत्र वाल्यांना पाने भरवायला कंटेंट मिळणार. टीव्ही वाल्यांना दोन दिवस प्राईम टाइम साठी खाद्य भेटणार. सोशल मीडियावर दुखवटा जाहीर होणार. हे सर्व आपण कुणासाठी करणार तर आपल्या गर्दीतल्या मुलींसाठी. अरे पण लबाडानों त्या तिकडच्या गर्दीतल्या मुलीवर प्रत्येक मिनिटाला बलात्कार होतो. तेव्हा प्रश्न असा आहे की तिच्यावर दररोज बलात्कार होत असताना आपण काय करणार.?
आज सकाळी डोळे चोळत-चोळत वर्तमानपत्र उघडलं. कर्तबगार कामगिरी केलेल्या महिलांच्या पानभर बातम्या पहिल्या. आठवलं अरे आज जागतिक महिला दिवस. पटकन मोबाईल घेतला. महिला दिनाचा एक सुंदर मेसेज कॉपी पेस्ट मारला आणि भरकन ओळखीतल्या सर्व मैत्रिणींना पाठवून दिला. मनाला बरं वाटलं. आपण स्रियांचा सन्मान वगैरे करतो याचा ५६ इंच अभिमान वाटला आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतली. बहिणीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं ठरवलं. तेवढंच आपणही खुश आणि ती पण खुश. प्रत्येकजण आपल्या बायकोसाठी/ बहिणीसाठी/मैत्रीणीसाठी असंच काहीतरी करत असणार. काही नवरे आजचा दिवस बायकोला स्वयंपाकाला सुट्टी देतात. महिला दिनाला असंच काहीतरी करायचं असतं. मग हळूच विचार मनात आला की आजच्या दिवशी तिथल्या बायका महिला दिवस कसा साजरा करत असतील.? क्षणभर सुन्न वाटलं आणि परत त्या वर्तमान पत्रातील “गर्दीत नसलेल्या” कर्तबगार महिलांच्या स्टोऱ्या वाचू लागलो.
विजय ढोबळे.(लेखक हे मुक्त पत्रकार असून ते “विचारवेध” या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करतात)
७७०९०८२०२५