महिलादिनाच्या निमित्ताने.. दोन शब्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महिला दिन विशेष | संदीप कदम

ती आई आहे, ती ताई आहे
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे
ती मुलगी आहे, ती जन्म आहे
ती माया आहे, आणि सुरुवात नसेल तर बाकी सारे व्यर्थ आहे…

“आज ८ मार्च जागतिक महिला दिन” आजचा दिवस म्हणजे जगातील प्रत्येक स्त्री जातीचा सन्मान व गौरव… सर्व महिलांना जागतिक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…खरे तर महिला दिन हा एक दिवसापुरता मर्यादित न राहता त्याला व्यापक रूप प्राप्त झाले पाहिजे कारण तिचे कर्तुत्व एवढे मोठे आहे की ते साजरे करण्यास आपल्याला ३६५ दिवस ही कमी पडतील. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे महिला पोहोचली नसेल हा दिवस का साजरा केला जातो माहित आहे का तुम्हाला?

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो या दिवसाची खरी सुरुवात ही स्त्रियांना सामाजिक,आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक घटकात सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे यासाठी १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनांनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आले. खरे तर भारतात याची सुरुवात मुंबई मध्ये ८ मार्च 1943 रोजी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतोच.जसे राजमाता जिजाऊ यांनी शिवबा घडविला, मेरी झांसी नही दुंगी असे म्हणत इंग्रजांविरुद्ध लढा देणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, माता रमाई ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना संसाराचा गाडा चालवला,आजची स्त्री आपल्याला सक्षम दिसते आहे ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्त्री जातीला शिक्षित करण्याबरोबरच सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतीबांच्या समाजसुधारणा कार्यात ही हातभार लावला.

अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्यांची महिला दिनानिमित्त आठवण आल्याशिवाय राहणारच नाही.या स्त्री मातेचे आदर्श घेऊन २१ व्या शतकात स्त्रिया ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवताना दिसतात जसे भारतीय पहिल्या व्यवसायिका महिला प्रेम माथुर, भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी, भारतीय पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा, सैन्यदलातिल महिलांचा प्रवेश, पहिल्या IPS अधिकारी किरण बेदी,गानसम्राज्ञी लता मंगेशकर, विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय जणू ही यादी न संपणारीच स्त्री ही श्रद्धा, त्याग,नम्रता,विचार,शीलता व सुजाणपणा याची जणू मूर्तीच. आजच्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेतलेल्या स्त्रियांचा सन्मान हाच खरा जागतिक महिला दिन. आजच्या एकविसाव्या शतकात स्त्री ही कोणत्याच बाबतीत कमी नाही. प्रत्येक क्षेत्रात तिने नावलौकिक मिळवलेले दिसून येते.

प्रत्येक स्त्री हि कोणाची आई तर कोणाची बहीण, मुलगी,मैत्रिण,प्रेयसी,पत्नी सून,सासू,आजी पाठीराखी व मार्गदर्शक असे कित्येक रूपे तुझी संकटकाळी दुर्गेचा अवतार म्हणजे स्त्री प्रेमाचा निर्मळ झरा म्हणजेच स्त्री कंडक्टर पासून कलेक्टर पर्यंत,सरपंचा पासून पंतप्रधानांपर्यंत,कवित्री पासून कलाकारा पर्यंत तर शिक्षिके पासून कुलगुरू पर्यंत असे वेगवेगळे क्षेत्र तिने तिच्या प्रयत्नांची पराकाष्टा करून स्वतःला सिद्ध केलेले दिसून येते. पण एक प्रश्न मनात अनुत्तरितच राहतो आज खरेच स्त्री ही सुरक्षित व सक्षम आहे का ? तिच्या देहावर फिरणाऱ्या वाईट पुरुषी नजरा,कामाच्या ठिकाणी मिळणारी कमीपणाची वागणूक, पुरुषी वर्चस्वाची मानसिकता, समाजव्यवस्थेत असलेले तिचे दुय्यम स्थान,तिच्यावर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार हाच का स्त्री सन्मान ? या गोष्टी कुठेतरी बदलल्या पाहिजेत कुटुंब व्यवस्थेत तिचे मत विचारात घेतले पाहिजे,कौटुंबिक तसेच सार्वजनिक ठिकाणी तिला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. खरेतर तिला फक्त सामाजिक व राजकीय आरक्षणच नको तर मानसिक आरक्षणाची ही खरी गरज आहे. आज समाजातील प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे,प्रत्येक स्त्री हि धाडशी कर्तुत्ववान, हिंमतवान व उच्चशिक्षित बनली पाहिजे,तिच्यात शारीरिक व मानसिक सक्षमता निर्माण झाली पाहिजे असे होण्यासाठी प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला पाहिजे तरच स्त्री पुढे जाईल.

स्त्री व पुरुष समानता हे फक्त बोलण्या व म्हणण्या पुरतेच मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात ही तिला समतेची वागणूक मिळालीच पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा करण्यास अर्थ प्राप्त होईल…

संदीप कदम-लिंगणकेरूर (जि.नांदेड)

Leave a Comment