औरंगाबाद | बीड बायपासचे रुंदीकरण, मजबुतीकरण सध्या सुरु आहे. या रस्त्यावर भविष्यात वाढणारी वाहतूक लक्षात घेता तीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या वाहतुकीला अडथळा येऊ न देता पुलांचे काम करण्यासाठी तीन यंत्रणांच्या समन्वयानंतर अडचणी दूर झाल्या आहेत. येत्या सोमवारपासून संग्रामनगर टी पॉइंटच्या उड्डाणपुलाचे काम सुरु होण्याची शक्यता आहे.
शहरातून जाणाऱ्या जालना रस्त्यावरील जड वाहतुकीला पर्यायी रस्ता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागांतर्गत, ‘बांधा-वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वाखाली बीड बायपास बांधला गेला. बीड बायपास मजबुतीकरण व रुंदीकरणाच्या प्रस्तावास हायब्रीड अॅन्यूटी प्रकल्पांतर्गत मान्यता दिली गेली. वर्षभरात साइड पट्ट्यांचे मजबुतीकरण केले गेले. या प्रस्तावात संपूर्ण रस्ता काँक्रिटचा केला जाईल. तसेच एमआयटी कॉलेज, संग्रामनगर टी पॉइंट आणि देवळाई चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.
बीड बायपासवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. त्या दृष्टीकोनातून वाहतूक पोलीस, प्रशासनाने जड वाहतुकीसाठी विशिष्ट वेळा निश्चित केल्या आहेत. जेणेकरुन छोट्या वाहनांची अडचण होणार नाही. गेल्या काही दिवसांत उड्डाणपूल उभारण्यासाठी बोअरिंग, जमीन तपासणी केली गेली. सर्व चौकांमध्ये असलेले सिग्नल हटवून अन्यत्र शिफ्ट केले. तर चौकात पूल उभारणी करताना वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे वाहतूक शाखेने जागतिक बँक प्रकल्प विभागास कळविले होते. त्यानुसार संग्रामनगर टी पॉइंटवरील सिग्नल हलविले आहेत.
या चौकात सहा मीटरचे बॅरिकेडिंग केले जाईल. ज्यामुळे कामाची सुरवात होईल आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल त्यावर उर्वरित दोन उड्डाणपुलांची कामे सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तिन्ही उड्डाणपुलांचे डिझाइन तयार झाले आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.