वाळूज : बजाजनगर येथील आनंद जनसागर मंगल कार्यलयासमोरील भगवान हाऊसिंग सोसायटीत भाऊसाहेब बोगांणे यांच्या घरात पत्नीसाह किरायाने राहणाऱ्या विष्णू केशवराव तौर (वय 32) या तरुण कामगारांने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
विष्णुने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. विष्णू मुळ टोकी ( ता. जि. उस्मानाबाद ) येथील रहिवासी असून तो कामानिमित्त वाळूजला आला होता. सहा महिन्यापूर्वी पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. तौर दांपात्याला एक मुलगा झाला तेव्हापासून पत्नी रुपाली आजपर्यंत माहेरी आहे, तर इकडे विष्णू स्वतःच स्वयंपाक करून कंपनीत जात होता.
अनेकदा विष्णुकडे नातेवाईक मनीष साळुंके येत असत. शुक्रवारी रात्री मनीष विष्णूकडे आला. मात्र, विष्णूने दार न उघडल्याने तो परत गेला. तसेच विष्णू फोनही घेत नसल्याने शनिवारी पुन्हा मनिष विष्णुकडे गेला. या वेळी विष्णुला हाका मारत दरवाजा उघडण्यासाठी सांगत होता. मात्र, कुठलाच प्रतिसाद येत नसल्याने खिडकीतून डोकवला पाहिले असता विष्णुने गळफास घेतल्याचे निर्दशनास आले.