तुम्ही महिला आहात अन् कामाच्या ठिकाणी तुमचा लैंगिक छळ होतोय, पोलिसंही FIR दाखल करत नाहीयेत?

कायद्याचं बोला #3 | स्नेहल जाधव

आपल्यापैकी अनेक महिला लैंगिक छळाला सामोर्‍या जात असतात. नोकरी करणार्‍या स्त्रियांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अशा समस्यांना सामोरे जावे लागत असते. मात्र आपला लैंगिक छळ होतोय हेच त्यातील अनेकिंच्या लक्षात येत नाही. लैंगिक छळ नक्की कशाला म्हणतात? कामाच्या ठिकाणामध्ये नक्की कोणकोणती ठिकाणे येतात? याबाबत महिलांमध्ये म्हणावी तशी माहिती नाही.  महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन लैंगिक अत्याचाराविरुद्ध विविध कायदे बनवले गेले आहेत. त्या कायद्यांची माहिती प्रत्येक महिलेला असणं आवश्यक आहे. आणि म्हणुनच आज आपण या कायद्यांबद्दल सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

नोकरी करणाऱ्या स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी “कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३” [Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013] (विशाखा मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित) हा कायदा २०१३ साली अस्तित्वात आला.

१) कामाच्या ठिकाणात नेमकी कोणती ठिकाणे येतात? तर, असे एकही क्षेत्र कायद्याने वर्ज्य केले नाही, ज्याचा समावेश ‘कामाच्या ठिकाणात’ होणार नाही. कामाची विविध क्षेत्रे उदा. शासकीय, खासगी, शैक्षणिक, व्यावसायिक, इस्पितळे, उत्पादन-पुरवठा, विक्री, वितरण, प्रशिक्षण केंद्र, घर, दहापेक्षाही कमी कामगार असणारी असंघटित क्षेत्रे तसेच कामावर असताना कर्मचाऱ्याने भेट दिलेले कोणतेही ठिकाण आणि तिथे जाण्यासाठी मालकाने पुरवलेले वाहन या सगळ्यांचा समावेश कामाच्या ठिकाणात होतो. या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा ‘कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ’ या प्रकारात मोडतो.

२) एखाद्या स्त्रीला पुरुषाच्या देहबोलीवरून अश्लील वर्तन सुस्पष्ट होत असेल किंवा शारीरिक स्पर्श, लैंगिक संबंधाची मागणी, लैंगिक शेरेबाजी, कामूक वा अश्लील चित्रे दाखवणे, एसएमएस, ईमेल करणे किंवा अश्लील चित्रीकरण दाखवणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक, शाब्दिक, अशाब्दिक प्रकारातील लैंगिक स्वरूपाचे अस्वागतार्ह वर्तन (अश्लील शेरे, वाईट नजर, शिट्टी मारणे, हात धरणे इ.) करणे याला कायद्यात ‘लैंगिक छळ’ म्हटलं जातं. या प्रकारचे सगळेच वर्तन लैंगिक छळात बसते. हे नोकरी व व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनी लक्षात घ्यायला हवे आणि सावध राहायला हवे.

पण पोलीस तक्रारच नोंदवून घेत नाहीत/ टाळाटाळ करतात अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. मग पोलीस तक्रार नोंदवून घेत नसतील तर काय करावे? –

१) स्थानिक पोलीस तक्रार नोंदवून घेत नसतील तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तशी तक्रार करावी. किंवा सामाजिक महिला कार्यकर्त्या किंवा सामाजिक जाण-भान असणाऱ्या वकीलांशी किंवा पत्रकारांशी संपर्क करून त्यांना ही बाब लक्षात आणून द्यावी.

२) एवढं करूनही काही फायदा होत नसेल तर न्यायालयात वकीलामार्फत खाजगी खटला (private complaint) करून दाद मागता येते. सदर खटल्यात न्यायाधीशांना सबळ पुरावे आढळले तर न्यायाधीश स्वतः आरोपीला कोर्टामार्फत समन्स/नोटीस काढून कोर्टात हजर होण्याचे आदेश देतात.

३) न्यायालयीन मदत –
सदर खटल्याचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जातो. खटला सुरू झाल्यावर संबंधित पीडित महिलेचे जबाब हे संबंधित न्यायालय गुप्त पद्धतीने (in-camera) नोंदवून घेते शिवाय तिची संपूर्ण माहिती गुप्त ठेवली जाते. आवश्यकता भासल्यास न्यायालय संरक्षण आदेश व नुकसानभरपाई आदेश ही देऊ शकते.

शासनातर्फे सरकारी वकील दिला जातो. पण त्या सरकारी वकीलाच्या कामावर तुम्हाला शंका निर्माण होत असेल तर विशेष सरकारी वकीलाची मागणी पीडित किंवा तिचे नातेवाईक करू शकतात ज्याचाही संपूर्ण खर्च शासनातर्फेच केला जातो.

कायदा तर तुम्हाला मदत करायला तत्पर आहेच पण काही गोष्टी स्वतः मुली आणि पालकांनी, सुज्ञ नागरिकांनी करणं आवश्यक आहे. तर तुम्ही करायचं काय आहे?

मुलींनी/स्त्रियांनी काय करावं? –
१) कुठल्याही परिस्थितीला न घाबरता धाडसी वृत्तीने सामोरं जावं.
२) नेहमी स्वतःजवळ मिरचीपूड, पेपर स्प्रे अशा गोष्टी सोबत बाळगाव्या.
३) कसलीही आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास १०० नंबर ला संपर्क साधावा काही कारणास्तव संपर्क न झाल्यास स्थानिक पोलीस स्टेशन चा संपर्क क्रमांक जवळ ठेवून त्यावर संपर्क साधावा.
४) प्रतिबंधक पाऊल म्हणून स्थानिक पोलीस स्टेशनमधून निर्भया पथकाचा व त्या पोलीस स्टेशन चा संपर्क क्रमांक घेऊन ठेवावा.
५) छेडछाडी सारख्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्याचवेळी आरडाओरडा करून लोकांना गोळा करून त्या इसमाचे दुष्कृत्य लोकांसमोर आणावे.
६) महिलांनी एकमेकींचा दुस्वास न करता न घाबरता एकमेकींना योग्य ती मदत करावी.
७) वेळोवेळी कायद्याच्या तरतुदींबद्दल जागरूक रहायला हवं.
८) कुठल्याही आमिषाला बळी न पडता सावधगिरी बाळगावी.
९) स्वसंरक्षण करायला शिकावं. इ.

नागरिकांनी/पालकांनी काय करायचं? –
१) छेडछाडी सारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तरी बंद करा. कारण छेडछाड असो; विनयभंग असो वा बलात्कार; गुन्हा हा गुन्हा असतो. छेडछाड होत असताना फक्त बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा वेळीच मदत करत जा. बलात्कार झाल्यावर निषेध व्यक्त करून मोर्चे काढण्यापेक्षा वेळीच आवाज उठवलेला बरा!
२) स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मनावर पुरुषप्रधान विचार बिंबवणे बंद करायला हवे. म्हणजे स्त्रीवर कायम पुरुषी वर्चस्व असावं हा विचार मुलगाही करणार नाही आणि मुलगीही नाही.
३) मुलीला अगदी लहानपणापासूनच “so called” “स्त्री” नावाच्या साच्यात अडकवणं बंद करा. तिला जगू द्या एक माणूस म्हणून. म्हणजेच फक्त “ममतेची,दयेची,क्षमेची, सहनशीलतेची मूर्ती” अशा frame मध्ये न अडकवता धाडसी, कणखर आणि निर्भय हे गुण तिच्यात बाणवा.
४) आपल्या मुलीला स्वसंरक्षण करायला शिकवावं. (कराटे, जुडो शिकवावं इ.)
५) स्वतःच्या मुलांना लहानपणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवावा. इ.

जेव्हा स्त्री या सर्व गोष्टी लक्षात ठेवून खऱ्या अर्थाने सक्षम होईल, स्वतः वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्वतःच लढा देईल तेव्हाच ती सबला झाली असे म्हणता येईल. आणि तीच खरी सुरुवात ठरेल “प्रगत भारत देशाची”.

– ॲड स्नेहल जाधव
संस्थापक, कायदादुत संस्था

You might also like