मोदी देशाचे पंतप्रधान होण्याची भविष्यवाणी करणारे प्रसिद्ध ज्योतिष बेजान दारूवालांचा कोरोनानं मृत्यू

अहमदाबाद । लोकप्रिय आणि नामांकित ज्योतिष बेजान दारूवाला यांचा शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. वयाच्या ८९ व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील एका रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते आजारी होते. मागील आठवड्यात त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

गेल्या शनिवारी म्हणजेच २२ मे रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, अशी माहिती त्यांचे सुपुत्र ज्योतिषी नस्तूर दारूवाला यांनी दिली. बेजन दारूवाला यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरत होत्या. नस्तूर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, बेजन दारूवाला न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे आजारी होते. शरिरातील ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती. त्यामुळे  त्यांना अहमदाबादच्या अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी बेजन दारूवाला यांच्या निधनाबाबत ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

११ जुलै १९३१ मध्ये गुजरातमध्ये एका पारसी कुटुंबात बेजान दारूवाला यांचा जन्म झाला. ते इंग्रजीचे अध्यापक होते. देशभरात अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेलं राशीभविष्य प्रसारित होत असे. बेजान दारूवाला यांनी २५ एप्रिल २००३ रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आपल्या वेबसाइटचा शुभारंभ केला. बेजान दारूवाला यांनी संजय गांधी यांच्या अपघाताची आणि २०१४ मधील पंतप्रधान मोदी यांची भविष्यवाणी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”