औरंगाबाद : चिऊताई चिऊताई दार उघड, चिमणी उडाली भुर्रर्र… असे आपण लहानपणी म्हणायचो. लहानपण गेले आता नवीन पिढीतील लहान मुलांना चिमणी उडाली भुर्रर्र हे दाखविण्यासाठीदेखील चिमणी दिसेनाशी झाली आहे. चिमणीचे घरटे कुठेही दिसेनासे झाले आहे. त्यामुळे चिमण्यांची चिव चिव आता दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे चिमणी आता खरच भुर्रर्र…उडून गेली काय? असा प्रश्न पडायला लागला असल्याचे मत पक्षीमित्रांकडून व्यक्त केले जात आहे.
एकीकडे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. तर दुसरीकडे मात्र निसर्गाचा होणारा ऱ्हास देखील पाहायला मिळत आहे. पहिल्यासारखे झाडे आता पहायला मिळत नाही. पूर्वीच्या काळी चिमण्या घराच्या बाहेर अंगणात चिव…चिव आवाज करत फिरायच्या. चिव चिव कानात घुमायचा. पण आता चिव चिव आवाज कानावर येत नाही. चिमण्यांची कमरतात जाणवायला लागली आहे.
आता चिमण्यांना परत येण्यासाठी कोणी प्रयत्न देखील करत नाही. अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस असा येईल की, लहान मुलांना चिमणी केवळ पोस्टरमध्ये किंवा फोटोतच दाखवावी लागेल. अजूनही हातात वेळ आहे. ज्या चिऊताई आहेत त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
चिऊताईला ठेवा पाणी…
चिऊताई चिऊताई परत ये.. असे म्हटल्याने चिऊताई परत नाही येणार. त्यासाठी आपल्याला पाणी ठेवावे लागेल. दाना टाकावे लागेल. याशिवाय झाड नसले म्हणून काय झाले घराच्या बाहेर कुत्रीम घरटे तयार करावे लागेल. चिऊताईचे घरटे बनविण्यासाठी तिला आपण जागाच नाही ठेवली. त्यामुळे आता चिऊताई कशी परत येईल? असा प्रश्न देखील पक्षिमित्र उपस्थित करत असून चिऊताई परत येण्यासाठी आपल्यालाच घरटे बनवावे लागेल.
खोक्यापासून देखील छोटेसे घरटे तयार करून चिमण्यांसाठी दाणे- पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी लागेल. सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर चिऊताई परत येईल, असे आवाहन पक्षिमित्रांकडून करण्यात आले आहे. अनेकांनी चिमणी परत येण्यासाठी प्रयत्न देखील केले आहेत. त्यांच्या सहकायार्ने, प्रेरणेने एक तरी घरटे तयार करावे. असे आवाहन पक्षीमित्रांकडून करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा