Wednesday, June 7, 2023

वा रे पठ्ठ्या ! थेट रेल्वे स्थानकातच उभी केली कार

औरंगाबाद | रेल्वेच्या नियमाप्रमाणे कोणतेही दुचाकी किंवा चारचाकी वाहन विनापरवाना रेल्वेस्थानकात आणण्यास किंवा पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. मात्र याच नियमांची सऱ्हास पायमल्ली करून थेट रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोर कार पार्किंग केल्याचा अत्यंत खेदजनक प्रकार लासुर स्टेशन येथे घडला. रेल्वे प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा मानसिक, आर्थिक मनस्ताप होऊ नये किंवा रेल्वे स्टेशनवरील अधिकारी-कर्मचारी यांना काम करताना कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी रेल्वे विभागाचे अत्यंत कडक नियम आहेत.

औरंगाबाद जवळील लासुर येथील रेल्वे स्टेशन अत्यंत महत्त्वाचे स्टेशन म्हणून ओळखले जाते. एखाद्या प्रवाशाने किंवा सामान्य नागरिकांनी रेल्वे स्टेशन किंवा प्लॅटफॉर्मवर मद्यपान करणे, थुंकणे, धूम्रपान करणे किंवा रेल्वे स्टेशन बिल्डींगमध्ये दुचाकी किंवा चारचाकी आणण्यास सक्त मनाई आहे. असे कोणी केल्यास त्यावर रेल्वे प्रशासन कडक कारवाई करते. त्यामुळे कोणताही प्रवासी किंवा सामान्य नागरिक रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आपापली वाहने उभी करतात. अपवाद फक्त दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत आहे. एखादा दिव्यांग व्यक्ती रेल्वेने जाणार किंवा येणार असेल तर मात्र त्याची अत्यावश्यक गरज म्हणून अशा वाहनांना परवानगी देण्यात येऊ शकते. अन्यथा कोणतेही वाहन रेल्वे स्टेशन बिल्डींग मध्ये नेण्यास सक्त मनाई आहे. विशेषत: स्टेशन मास्तर किंवा संबंधित अधिकारी अशी कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन असतात.

या स्टेशनवर जवळ-जवळ सर्वच प्रकारच्या रेल्वे थांबतात –
औरंगाबाद जवळील लासुर येथील रेल्वे स्टेशन अत्यंत महत्त्वाचे स्टेशन म्हणून ओळखले जाते. या स्टेशनवर जवळ-जवळ सर्वच प्रकारच्या रेल्वे थांबतात. त्यामुळे प्रवाशांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. याच रेल्वे स्टेशनच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या तिकीट खिडकीसमोर पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कार (एम एच 20 ईजे – 3475) ही बिनदिक्कतपणे व रेल्वेच्या नियमांची पायमल्ली करून उभी होती. विशेष म्हणजे या खिचडीजवळच रेल्वेच्या वेळापत्रकासह विविध फलक लावलेले आहेत. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून या कारच्या नंबर वरून माहिती काढली असता, ही कार शैलेंद्र कुमार शहा यांच्या मालकीची असून गट नंबर 38, फ्लॅट नंबर 302, बिल्डिंग नंबर 13, नक्षत्रवाडी औरंगाबाद असा त्याचा पत्ता आहे. या अशा प्रकरणांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.