ये भी तो इबादत है..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गणेशोत्सव  |  चिन्मय साळवी

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘रेड लेबल चहाने’ एक जाहिरात प्रदर्शित केली. त्या व्हिडीओमध्ये एक मुसलमान कारागीर गणपती बाप्पाची मूर्ती रंगवत असतो. त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाला या गोष्टीचे आश्चर्य वाटते, त्यामुळे तो त्या कारागीराला विचारतो ”हेच काम का ?” त्यावर कारागीर हसत हसत उत्तर देतो.. ”ये भी तो इबादत है.” (ही सुद्धा उपासनाच आहे)

या जाहिराती बद्दल सांगण्याचं कारण म्हणजे काल माझ्या घरी घडलेला प्रसंग. माझ्या कॉलेजमधले मित्र मैत्रिणी घरी बाप्पाच्या दर्शनाला आले होते. आमची एक इराणी मैत्रीणही त्यात होती. नायरेह इस्लामीअक्रम असं तिचं नाव. भारतात येऊन तिला तीन चार वर्ष झाली असली तरी कोणाच्या तरी घरी बाप्पाच्या दर्शनाला ती पहिल्यांदाच जात होती. घरात बसलेला बाप्पा, त्याच्या आजूबाजूची सजावट, गौराईच्या पुढे असलेले फराळाचे पदार्थ याबद्दल तिला फार अप्रुप वाटत होतं. प्रत्येक गोष्टी बद्दल तिला प्रश्न पडत होते आणि आम्ही सगळे मिळून त्या प्रश्नांची उत्तरे देत होतो. बाप्पाचे आणि गौरीचे कितीतरी फोटो काढून ती सोशल मिडियावर टाकत होती, तिच्या मायदेशातल्या मित्र मैत्रिणिंना पाठवत होती.

मग वेळ झाली आरतीची, आरती सुरु असताना ती टाळ्या वाजवत होती, आमचा उत्साह बघुन हसत होती. आरती झाल्यानंतर मात्र तिने मला विचारलं की मलाही आरती करता येईल का ?.. आता एकदा आरती झाल्यावर परत कशी आरती करणार या विचारात मी परवानगीसाठी माझ्या वडिलांकडे घाबरतच बघितलं, तर ते आरतीचं तबक तयार करत होते. मग आमच्या नायरेहच्या हस्ते बाप्पाची आरती झाली. नंतर ती कितीतरी वेळ भारावून जाऊन घरच्यांचे आणि माझे आभार मानत होती. पाच मिनिटांसाठी का होईना भारतीय आणि इराणी संस्कृती हातात हात घेऊन बागडल्या होत्या. मध्यंतरी आम्ही दिल्लीला असताना मी नायरेह सोबत जामा मस्जिदीत गेलो होतो तेव्हाचे तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि आरती करतानाचे भाव यांच्यात मला किंचितही फरक जाणवला नाही.

असे कितीतरी प्रसंग तुमच्या आजूबाजूला गणेशोत्सवात दिसतील. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरु झाला ते उद्दिष्ट आता मागे पडत आहे अशी ओरड बरेच जण करताना दिसतात. परंतु सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त वर्ष हा ‘लोकोत्सव’ लोकांना एकत्र आणण्याचे काम करत आहे. तुमच्या आजूबाजूला कुठेतरी शब्बीर चाचा बाप्पासाठी कोणती उदबत्ती जास्त चांगली असं सांगताना दिसतील, इस्माईल भाई बाप्पाच्या रथाचं वेल्डिंग करताना ‘बाप्पा ठीकसे बैठना मंगता, उसको तकलीफ हुई तो कैसे चलेगा’ असं सांगत असेल, दलविंदर पाजी आठवणीने बाप्पाला लस्सीचा नैवैद्य दाखवेल, सिरवि बंधुंच्या मोदकांशिवाय आरतीला सुरुवात होत नसेल. जात-पात-धर्म विसरून या एका सणासाठी कित्येक लोकांना एकत्र येताना मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय.

आता उद्यावर आलेल्या मोहरमसाठी कित्येक गणेश मंडळं ताबुतांच्या मिरवणुकीचं स्वागत करतील, त्यांच्या मिरवणुकांना वाट करून देतील, मिरवणुकीतल्या आपल्याच भावंडांसाठी पाण्याची, नाष्ट्याची व्यवस्था करतील. सातासमुद्रापार गेलेला हा उत्सव आपल्या देशातल्या जातीपातीच्या अदृश्य भिंतीच्याही पार जावा इतकीच बाप्पा चरणी प्रार्थना.

Chinmay Salvi

चिन्मय साळवी

Leave a Comment