सांगलीत प्रेमप्रकरणातून गळा आवळून तरुणीचा निर्घृण खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। सांगली बसस्थानकासमोरील असणाऱ्या ”टुरिस्ट लॉज” मध्ये एका १९ वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. दुपारच्या सुमारास खुनाची घटना घडली असावी असा अंदाज आहे. कोल्हापूर रोड येथे राहणारी १९ वर्षीय वृषाली अर्जुन सूर्यवंशी असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून प्रियकर आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश हत्तेकर यानेच खून केला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं असून, खून केल्यानंतर तो फरारी झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वृषाली बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीकडे जेवायला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत वृषाली घरात परत न आल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत होते. घरच्यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा मोबाईल लागला नाही. तसेच गुरुवारी पोलिसांना बसस्थानकासमोरील टुरिस्ट लॉज मधील एका खोलीत तरुणीचा घातपात झाला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार पोलीस लॉजमध्ये पोहोचले. पोलीस लॉजच्या व्यवस्थापकाला घेऊन खोली जवळ गेले. खोलीला बाहेरून कडी होती. पोलिसांनी कडी उघडून आत प्रवेश केला असता वृशालीचा मृतदेह पलंगावर पडला होता.

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता तिच्या गळ्यावर काळे निशाण आढळले. या प्रकरणी अविनाश लक्ष्मण हत्तेकर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. तो घटना घडल्यापासून फरार झाला होता. त्यांनी लॉजमध्ये आल्यावर दिलेल्या ओळखपत्रावरील फोटो आणि नाव अस्पष्ट आहे. दोघे जेंव्हा लॉजच्या रूम मध्ये जात होते त्यावेळी तो तिला मारहाण करतानाची दृश्ये सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर आणि संजयनगरचे स.पो.नि काकासाहेब पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी वृषालीचे कुटुंबीय उपस्थित होते. वृशालीचा मृतदेह पाहताच तिच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आणि अवघ्या पाच तासात अविनाश हत्तेकर याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. दरम्यान अविनाश हत्तेकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

Leave a Comment