Friday, June 2, 2023

बर्थ डे पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत केले विकृत कृत्य; मग ‘हे’ विचित्र कारण देत मोडले लग्न

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमधील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवले यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीच्या वाढदिवसादिवशी आरोपीने तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी केली. यानंतर आपला साखरपुडा झाला आहे, लवकरच आपण लग्न करणार आहोत, असं सांगून आरोपीनं पीडितेचे लैंगिक शोषण केले. शरीर संबंध ठेवल्यानंतर काही दिवसांनी आरोपीने ठरलेले लग्न मोडले. पीडित तरुणी आपल्याला अनुरूप नसल्याचे म्हणत त्याने हे लग्न मोडले. यानंतर या प्रकरणी पीडित मुलीने उमरेड पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि फसवणुकीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीनं आपल्यावरी गुन्हा खोटा असून तो रद्द करण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर म्हटलं की, आरोपीने उपस्थित केलेला अनुरूपतेचा मुद्दा खरा असता तर त्याने लग्नाला होकार दिला नसता. पीडिता शारीरिक संबंधास तयार नसताना त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं. लग्न ठरलेलेच होते. त्यामुळे युवतीनेही आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांवर विश्वास ठेवला आणि शारीरिक संबंधास होकार दिला. मात्र, आरोपीनं शारीरिक संबंधांनंतर लग्न मोडलं. त्यामुळे गैरसमजातून दिलेला होकार हा संमती म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. आरोपीने केलेली फस‌णूक ही साधीसुधी नसून हा बलात्कारासारखा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी या गुन्ह्याचा सखोल तपास होणं आवश्यक असून हा गुन्हा रद्द करता येणार नाही, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळून लावली आहे.

आरोपी तरुण हा भंडारा येथील रहिवासी आहे. तर पीडित तरुणी नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. जानेवारी 2020 मध्ये दोघंचं लग्न ठरलं होतं. दोघांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात दोघंही लग्न करणार होते. पण कोरोनाची दुसरी लाट आल्याने दोन्ही कुटुंबीयांनी हे लग्न पुढे ढकलले. यादरम्यान मे महिन्यात तरुणीला कोरोनाची लागण झाल्यामुळे हे लग्न पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले. यादरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीडित तरुणीचा वाढदिवस होता. यावेळी आरोपीनं एका रिसॉर्टमध्ये वाढदिवसाच्या पार्टीचे नियोजन केले होते. या पार्टीला आरोपीने आपल्या काही मित्रांना बोलावलं होतं. पार्टी झाल्यानंतर आरोपी पीडितेच्या खोलीत गेला आणि त्याने पीडितेकडे शरीर संबंधाची मागणी केली. तेव्हा पीडितेने त्याला नकार दिला. यानंतर आरोपीने काही दिवसांतच आपलं लग्न होणार असल्याचं खोटं आमिष दाखवले. शरीर संबंध ठेवल्यानंतर काही दिवसांनी आरोपीनं पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला.