सातारा जिल्हा परिषदेचे अभ्यास दौरे नेमके कशासाठी?; महारुद्र तिकुंडे यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। महेश पवार

सातारा जिल्हा कोरोना संसर्गातून आता कुठे बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच अस्मानी संकटाने सर्वसामान्यांचे आणि शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आशेने प्रशासनाकडे पाहत असतानाच सातारा जिल्हा परिषदेने लाखो रुपयांची उधळपट्टी करीत सो कॉल्ड अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या अनाठायी खर्चाविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा राज्य फौंडेशनचे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यातून त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे अभ्यास दौरे नेमके कशासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे.

महारुद्र तिकुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन दिले. यावेळी कपिल राऊत, नंदकुमार जावळे, हणमंत शिंदे, नागेश शिंदे यांचीही उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक वर्षी विविध विभागांचे अभ्यास दौरे आयोजित केले जात होते. परंतु मागील दोन वर्षांपासून देशावर व राज्यावर कोरोना महामारीचे संकट कोसळल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने असे अनाठायी होणारे खर्च थांबवून ते आरोग्यावर खर्च करण्याचे निर्देश दिलेले आहेत व तसे अध्यादेश संबंधित विभागांना पारीत केलेले आहेत. मग सातारा जिल्हा परिषद याला अपवाद कशी आहे? हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

कोरोना व ओला दुष्काळ सदृश्य परिस्थितीतून सातारा जिल्हावासिय जात असताना सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी अभ्यास दौर्‍यावर जात आहेत. याचा निषेध म्हणून विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने अध्यक्ष दालनास टाळेठोक आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल याची नोंद घ्यावी. तरी संबंधितांवर खर्च वसूली कामी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तिकुंडे यांनी केली आहे.

Leave a Comment