ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांच्या केसरीवाड्यातील गणपती हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी पाचवा गणपती आहे. त्या गणपतीबद्दल…
………स्नेहा कोंडलकर……..
केसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून केसरीवाड्यात १८९४ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक त्या वेळी विंचूरकर वाड्यात राहत होते. त्यानंतर १९०५पासून केसरीवाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. केसरीवाड्यातील गणपतीची मिरवणूक आजही पालखीतून काढण्याची परंपरा जपली गेली आहे.
लोकमान्य टिळक त्या वेळचे देशातील प्रमुख नेते होते. त्यांनी गणेशोत्सवाला सामाजिक भान दिले. हा उत्सव साजरा करण्यासाठी विविध जागृतीपर कार्यक्रम होऊ लागले. ही परंपरा आजही कायम आहे. गणेशोत्सवादरम्यान येथे विविध व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशमूर्तीची स्थापना टिळक पंचांगाप्रमाणे होते. १२४ वर्षांपासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आपले वेगळेपण केसरीवाडा गणेशोत्सवाने जपले आहे.
केसरीवाडा गणपतीची मूर्ती कायम स्वरुपी चांदीची असून त्यांची स्थापना दहा वर्षापूर्वी करण्यात आली, ती ज्ञानेश्वरीतील वर्णनाप्रमाणे घडवण्यात आली आहे. या मूर्तीला सहा हात आहेत. मूर्तीच्या एका हातात मोदक असून, दुसरा हात आशीर्वाद देत आहे. अन्य हातांपैकी एका हातात परशू, पाशांकुश, एका हातात चंद्र आणि एका हातात हस्तिदंत आहे. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सनी ही मूर्ती घडवली आहे. या मूर्तीसमोर मातीची उत्सवमूर्ती बसवली जाते. दर वर्षी गोखले हे पुण्यातील मूर्तिकार ही मूर्ती घडवतात.
पहिल्या दिवशी ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांचे आगमन होते. यंदा श्रीराम ढोलपथक बाप्पासमोर आपली कला सादर करणार आहे. तसेच ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक आणि सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या वेळी डॉ. गीताली टिळक-मोने, डॉ. प्रणती टिळक व केसरी परिवार उपस्थित राहणार आहे.
केसरीवाडा हे अनेक ऐतिहासिक घडामोडींचा वारसा जपलेले ठिकाण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून रोज दुपारी भजनी मंडळ येते. कार्यक्रमानिमित्त आलेल्या कलाकारांच्या हस्ते आरती केली जाते. केसरीवाड्याच्या गणपतीवर अनेकांची आस्था, श्रद्धा आहे. अनेक राजकीय पुढारी, सिनेमासृष्टीतले कलाकार दर्शनासाठी एक भाविक म्हणून दरसाल येथे हजेरी लावतात.
या वर्षी केसरीवाडा गणपतीला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी गिफ्ट रॅपिंग, पाककृती, पुष्परचना व फुलांची रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, क्ले मॉडेलिंग, नाट्यछटा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गणेश उपासना आणि आधुनिक जीवन, हिंदी चित्रपटातील गझल या कार्यक्रमांचे, तसेच चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत पानसुपारी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
(Bytes of India च्या सौजन्याने)