हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांचा संपर्क अधिक सुधारण्यासाठी तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे . मुंबई ते अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेन मार्गावरील बारा स्टेशनपैकी चार स्टेशन विशेष विकासासाठी निवडली आहेत. भारतीय रेल्वेच्या स्मार्ट (स्टेशन क्षेत्र विकास) योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विरार आणि ठाणे तसेच गुजरातमधील साबरमती आणि सूरत या चार स्टेशनचा समावेश असणार आहे. त्यामुळे या स्थानकांजवळील असलेल्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे.
TOD तत्त्वांचा अवलंब
स्मार्ट विकासात प्रवाशांसाठी सोयीसुविधा आणि सोपा प्रवास यावर भर दिला जाणार आहे , ज्यामुळे प्रवाशांना त्रासमुक्त प्रवास करता येईल. या स्थानकांच्या आजूबाजूच्या क्षेत्रात आर्थिक विकास वाढविण्यासाठी प्रकल्पात ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) तत्त्वांचा अवलंब करणार आहेत. TOD च्या माध्यमातून स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात कार्यालये, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सुविधा यांचा समावेश असेल, ज्यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल. त्यामुळे रोजगार निर्माण होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.
NHSRCL कडून विकास
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) कडून या बुलेट ट्रेन स्टेशन आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर विकसित केला जाईल. या स्टेशन परिसरात पिकअप आणि ड्रॉप ऑफ झोन, पार्किंग सुविधा, प्रवासी प्लाझा, आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश असेल. तसेच अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधामध्ये विकास केला जाईल. तसेच ही स्थानके मेट्रो, बस, आणि टॅक्सी सेवांसोबत जोडली जातील. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतूक साधनांमध्ये गाडी सहजपणे आणि अडथळ्याशिवाय बदलता येईल . याच्या एकत्रीकरणामुळे प्रवासाचा वेळ, गर्दी , वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होईल.
अर्थव्यवस्थेला गती
स्टेशन सुरू झाल्यानंतरच्या 10 ते 20 वर्षांच्या कालावधीत, राज्य सरकार, शहरी विकास प्राधिकरणे आणि नगर नियोजन प्राधिकरणे एकत्रितपणे या परिसराचा संपूर्ण विकास करण्याची योजना तयार करतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधांचा लाभ मिळेल. या कालावधीत अधिकारी रस्त्याचा मार्ग सुधारण्यासाठी आणि स्टेशनच्या आजूबाजूला पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतील.