मोठा धक्का! मार्चमध्ये तब्बल 51 लाख SIP खाती बंद; काय आहे कारण

sip (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारात चढ उतार होताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. तसेच अनेकांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. याचा परिणाम म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये झालेली गुंतवणूक 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. त्यामुळे अनेक खाती बंद झाली आहेत.

इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूक 14% घसरली –

मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक 14 टक्क्यांनी घटून 25,017 कोटी रुपये झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात गुंतवणुकीत घट झाली आहे. फेब्रुवारीत ही गुंतवणूक यापेक्षा जास्त होती.

SIP गुंतवणूकही 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर –

मार्चमध्ये SIP गुंतवणूक फेब्रुवारीतील 25,999 कोटी रुपयांवरून थोडीशी घसरून 25,926 कोटी रुपये झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 26,459 कोटी रुपये होता. डिसेंबर 2024 आणि नोव्हेंबर 2024 मध्ये अनुक्रमे 26,459 कोटी आणि 25,320 कोटी रुपये इतकी गुंतवणूक झाली होती. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात तब्बल 51 लाख SIP खाती बंद करण्यात आली आहेत, जे गुंतवणूकदारांच्या अस्वस्थतेचे स्पष्ट संकेत देतात.

सेक्टोरल/थीमॅटिक फंडांमध्ये 97% घट –

AMFI च्या आकडेवारीनुसार, सेक्टोरल आणि थीमॅटिक फंडांमध्ये गुंतवणूक महिना-दर-महिना आधारावर तब्बल 97 टक्क्यांनी घसरली आहे. याउलट, मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांमध्ये गुंतवणूक वाढताना दिसत आहे.

लार्ज कॅप फंडातही घट –

लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणूक फेब्रुवारीच्या 2,866 कोटी रुपयांवरून मार्चमध्ये 2,479 कोटी रुपयांवर आली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही गुंतवणूक 3,063 कोटी रुपये होती, तर डिसेंबर 2024 मध्ये 2,011 कोटी रुपये आणि नोव्हेंबर 2024 मध्ये 2,548 कोटी रुपये गुंतवले गेले होते. सध्या बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना सावधपणे पावले टाकत आहेत. येत्या काळात बाजाराची दिशा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास या दोन्ही गोष्टींवर पुढील गुंतवणुकीचे चित्र अवलंबून असेल.