हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका रिपोर्टनुसार पदव्यांचे महत्व कमी होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. देशातील जवळपास 83% इंजिनिअरिंग आणि 46% बिझनेस स्कूलमधील पदवीधर बेरोजगार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यांना नोकरी अन इंटर्नशिप मिळणे अवघड झाले आहे. ‘अनस्टॉप टॅलेंट रिपोर्ट 2025’ मध्ये यासंदर्भातील निरीक्षण मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार, विद्यार्थ्यांना नोकरी किंवा इंटर्नशिपची संधी मिळालेली नाही. यावरून भारतीय शिक्षण प्रणालीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सर्वेक्षणातील महत्त्वाचा निष्कर्ष –
सर्वेक्षणातील महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, GenZ मधील 51% पदवीधरांना सुरक्षित नोकरीपेक्षा उत्पन्नाचे विविध स्रोत असणे अधिक महत्त्वाचे वाटते. फ्रीलान्सिंग, इतर अस्थायी कामे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरु करण्याकडे ते वळत आहेत. बी-स्कूलमधील पदवीधरांमध्ये हा ट्रेंड अधिक स्पष्ट दिसतो. तसेच, या सर्वेक्षणात 30,000 पेक्षा अधिक GenZ पदवीधर आणि विविध कंपन्यांच्या मानव संसाधन विभागातील 700 अधिकारी सहभागी झाले होते. त्यात 72 % इंजिनिअरिंग महाविद्यालयांमधील, 16 % बी-स्कूलमधील, आणि 12 % कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांतील पदवीधर होते.
GenZ चे करिअर –
GenZ च्या करिअरबद्दल सांगितल्यास, 77% GenZ पदवीधारकांना त्यांच्या कामाचे नियमित मूल्यांकन करणे महत्त्वाचे वाटते. या मूल्यांकनामुळे कार्यप्रवाह सुरळीत राखला जातो, अशी त्यांची धारणा आहे. त्यानुसार, आजच्या भरती प्रक्रिया आणि कामाच्या मूल्यांकन पद्धतीत काही बदल आवश्यक असल्याचे संकेत मिळतात. जवळपास 73% भरती करणारे अधिकारी महाविद्यालयांच्या ब्रँडला फारसे महत्त्व देत नाहीत, आणि 71% अधिकारी अजूनही पारंपरिक पद्धतीने कामाचा आढावा घेतात, जसे की वार्षिक, सहामाही आणि तिमाही कालावधीत.