वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या गावी जात असतात. या काळात बस आणि रेल्वेला मोठी गर्दी असते. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात रेल्वेला प्राधान्य दिले जाते. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता सणासुदीच्या काळात विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे खात्याकडून घेण्यात आला आहे. पुणे ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
रेल्वे प्रशासन आगामी काळात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हडपसर ते लातूर दरम्यान विशेष गाडी चालवणार असल्याची माहिती आहे. या गाडीमुळे मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने पुण्याला पोहोचता येईल. सोबतच ही गाडी सोलापूरकरांसाठी देखील अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
सध्याच्या वेळेनुसार पाहायला गेल्यास सोलापूर ते पुणे असा प्रवास करण्यासाठी खूप कमी रेल्वे गाड्या आहेत. जर सोलापूरकर कुर्डूवाडीला एसटीने गेले तर तिथून लातूर हडपसर(पुणे) दिवाळी विशेष एक्सप्रेसने पुण्याला सहज जाता येणं शक्य होणार आहे. तसेच सोलापूरकरांना या गाडीमुळे कुर्डूवाडी येथून लातूरला जाणं देखील सोयीचे होणार आहे
कसे असेल वेळापत्रक ?
लातूरहून हडपसरला जाणारी विशेष ट्रेन 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर यादरम्यान दर सोमवार, मंगळवार,बुधवार तसेच शुक्रवारी चालवली जाणार आहे. या काळामध्ये लातूर- हडपसर दिवाळी विशेष गाडी लातूर इथून सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी सोडली जाईल आणि कुर्डूवाडीला दुपारी साडेबारा वाजता येईल तर हडपसरला संध्याकाळी तीन चाळीस वाजता पोहोचणार आहे. तर हडपसर ते लातूर ही दिवाळी विशेष गाडी हडपसर इथून सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही गाडी कुर्डूवाडीला संध्याकाळी साडेसहा वाजता पोहोचणार आहे. तसेच लातूरला नऊ वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे.
‘या’ ठिकाणी घेणार थांबे
हडपसर ते लातूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष ट्रेनला हरंगुळ, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डूवाडी, जेऊर आणि दौंड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर दिवाळीच्या सणानिमित्त पुणे ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे असा प्रवास करणार असाल तर नक्की या विशेष गाडीचा वापर करू शकता.