AI तंत्रज्ञानाने ऊस उत्पादनात क्रांती; शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार

AI (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्रात प्रगती साधली आहे. त्यामुळे आता सर्वच क्षेत्रात या भन्नाट तंत्रज्ञानाचा वापर केलेला दिसून येतोय. हे तंत्रज्ञान (AI – आर्टिफिशियल इंटेलिजन्स) शेतीसाठी सुद्धा एक वरदान असून, शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून ऊस उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ साधावी, असे प्रतिपादन नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कृषितज्ज्ञ अरुण देशमुख यांनी केले आहे. तसेच यातून पिकाची गुणवत्ता सुधारेल अन शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळेल असेही सांगण्यात आले आहे.

ऊस शेती आणि ए. आय. तंत्रज्ञान –

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, व्ही. एस. आय. पुणे ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती अन नेटाफिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “भविष्यातील ऊस शेती आणि ए. आय. तंत्रज्ञान” या चर्चासत्रात ते बोलत होते. हे चर्चासत्र पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.

साखर उत्पादनात 26 टक्क्यांची घसरण –

देशमुख यांनी सांगितले की, चालू हंगामात राज्यात ऊस गळीतात 21 टक्के घट झाली असून, साखर उत्पादनात 26 टक्क्यांची घसरण झाली आहे. ही गंभीर बाब असून यावर उपाय म्हणून आधुनिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धती सोडून ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन आणि पाण्याचे अचूक नियोजन यासाठी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब –

“पांडुरंग साखर कारखाना ऊस उत्पादन वाढवण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे. सभासदांमध्ये स्पर्धा, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब यामुळे कारखान्याचे एकरी सरासरी ऊस उत्पादन 123 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे,” असे देशमुख म्हणाले.

ए. आय. तंत्रज्ञानाचे फायदे –

ए. आय. तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी पाण्याचे अचूक प्रमाण, संभाव्य रोग व त्यावरील उपाय, योग्य फवारणी, योग्य खत वापर, अन रान तयार करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात सखोल मार्गदर्शन मिळते. यामुळे 10-12 महिन्यांमध्ये ऊस उत्पादनात मोठी वाढ शक्य होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या चर्चासत्रात शास्त्रज्ञ अनिल मुंडे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ संतोष कारंजे, पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक दिनकर मोरे, आणि कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.

“शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीच्या दिशेने पावले उचलावीत आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आपले उत्पादन व उत्पन्न दोन्ही वाढवावे,” असे आवाहन देशमुख यांनी शेवटी केले.