महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यातील काही ठराविक मतदारसंघाचे निकाल अद्याप बाकी आहेत मात्र एकूणच जे चित्र दिसत आहे ते महायुतीच्या बाजूला झुकलेला दिसत आहे. कारण महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळालेला आहे. आज दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी मिळालेल्या आकडेवारीनुसार 225 जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर यश मिळाल्याचे दिसते आहे. तर इतर पक्षांना 13 जागा मिळालेल्या आहेत.
महायुतीच्या आणि भाजपच्या मोठ्या विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे घेतलं जात आहे. एवढंच नव्हे तर त्यांना ‘चाणक्य’ म्हटलं जात आहे. मात्र विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी “मी चाणक्य नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता आहे! असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना केलं.
‘एक हे तो सेफ है’
यावेळी माध्यमांशी बोलताना ‘एक हे तो सेफ है’ या मोदींच्या नाऱ्याचं कौतुक करत मोदींच्यामुळं, मोदी पाठीशी असल्यामुळे ही यशस्वीतेची लढाई जिंकू शकलो असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. याशिवाय हा आशीर्वाद हा आमच्या लाडक्या बहिणींचा आहे असं म्हणत त्यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.
याशिवाय पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचे क्रेडिट हे त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. ज्या संघटनांनी महायुती सोबत काम केले आहे. त्या संघटनांचा हा विजय आहे. महाराष्ट्राला एक ठेवणाऱ्यांचा हा विजय आहे. हा एकजुटीचा विजय आहे असं म्हटलं आहे.
शिवाय केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे देखील देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले. याबरोबरच पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी कोणतेही ठोस उत्तर न देता याबाबतीत महायुती सरकारचे तिन्ही नेते आणि आमचे ज्येष्ठ केंद्रीय नेते हे सर्व मिळून चर्चा करून ठरवतील असं उत्तर त्यांनी दिलं.