शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवत, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने अवघ्या ३२ सेकंदांत तपासण्यात आल्या. हा अनोखा प्रयोग भारतात शाळा पातळीवर प्रथमच करण्यात आला असून, त्यामागे आहे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचे मार्गदर्शन. या प्रकल्पामुळे शिक्षण क्षेत्रात AI च्या वापराची नवी दिशा समोर आली असून, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी वेळेची आणि गुणवत्तेची बचत करणारी ही पद्धत भविष्यात मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाण्याची शक्यता आहे.
12 शाळांमध्ये 225 विद्यार्थ्यांवर प्रयोग
सोलापूर जिल्ह्यातील १२ जिल्हा परिषद शाळांमधील २२५ विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका AI च्या साहाय्याने तपासण्यात आल्या. हा प्रयोग संशोधनात्मक पद्धतीने राबवण्यात आला. AI ने तपासलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांशी तुलना करण्यात आली. AI तपासणीच्या निकालांमध्ये १२% उत्तरपत्रिकांमध्ये गुणांमध्ये फरक दिसून आला, आणि या फरकात बहुतेक ठिकाणी AI ने अधिक अचूक निकाल दिले. त्यामुळे AI ची कार्यक्षमता आणि विश्लेषण क्षमतेवर शिक्कामोर्तब झालं आहे.
‘हॅक द क्लासरूम’
या प्रयोगासाठी डिसले गुरुजींनी ‘हॅक द क्लासरूम’ नावाचे AI मॉडेल विकसित केले. हे मॉडेल Google Gemini च्या सहाय्याने तयार करण्यात आले असून, मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका तयार करणे आणि तपासणे यासाठी विशेषतः डिझाइन केलेले आहे. या प्रकल्पासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन लॅबचे सहकार्य लाभले आहे. एप्रिल २५ ते ३० दरम्यान प्राथमिक चाचणी घेऊन मॉडेलची उपयुक्तता तपासण्यात आली.
गती आणि अचूकता
प्रयोगादरम्यान, २० गुणांच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना सरासरी १ मिनिट ४२ सेकंद, तर ५० गुणांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ५ मिनिटे २७ सेकंद लागले. याउलट, AI ने हेच काम फक्त ३२ सेकंदांत पूर्ण केलं. AI च्या तपासणीची अचूकता ९५% इतकी नोंदवली गेली. मात्र, काही ठिकाणी AI ला हस्ताक्षर ओळखण्यात अडचण आली, तसेच २% प्रश्न चुकीचे असल्याचेही AI ने स्वतःहून दाखवून दिले.
AI कडून वैयक्तिक लर्निंग प्लॅनही तयार
AI ने केवळ उत्तरपत्रिका तपासण्यापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या गुणांच्या आधारे त्यांच्या कमकुवत बाबींवर आधारित ६ आठवड्यांचा वैयक्तिक अभ्यासक्रम (Learning Plan) तयार केला. हा प्लॅन १ मे ते १० जून या कालावधीत अंमलात आणण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
शिक्षकांसाठी मदतनीस, शिक्षण क्षेत्रात नवी दिशा
AI च्या या प्रयोगामुळे शिक्षकांचे काम हलकं झाले असून, परीक्षेच्या निकालात पारदर्शकता आणि अचूकता आली आहे. डिसले गुरुजींनी याबाबत सांगितले की, “AI शिक्षकांची जागा घेणार नाही, मात्र एक प्रभावी सहाय्यक म्हणून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करणार आहे.”
ग्रामीण शिक्षणात AI क्रांतीची पहिली पायरी यशस्वी
सोलापूरच्या या प्रयोगाने ग्रामीण भागातही शिक्षण क्षेत्रात नवतंत्रज्ञान प्रभावीपणे वापरता येऊ शकते हे सिद्ध केलं आहे. ‘हॅक द क्लासरूम’ हा AI प्रकल्प भविष्यात इतर जिल्ह्यांमध्येही राबवला जाण्याची शक्यता आहे. सध्यातरी, हा भारतातील शाळांमधील AI वापराचा पायोनियर प्रोजेक्ट ठरत आहे.