देशभरात मोठमोठे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी रस्त्यांची मोठी महत्वाची भूमिका आहे. परिणामी उद्योग व्यापाराला चालना मिळणार आहे. राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून पुणे शहराचं नाव घेतलं जातं. आता पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहेत. याच्या अंतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा मार्ग केवळ दोन तासांत पार करता येणार आहे. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया…
2633 हेक्टर जमीन संपादित करणार
या मार्गाचे काम बीओटी तत्त्वावर करण्यात येणार आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर 2008 च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर कर आकारण्यात येणार आहे. तर या मार्गासाठी 2633 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पुण्यापासून शिरूर पर्यंत उन्नत म्हणजेच एलिव्हेटिव्ह रोड बांधण्यात येईल तो 53 किलोमीटरचा असेल आणि तो ग्रीनफिल्ड मार्गाशी जोडला जाईल. तसंच ग्रीनफिल्ड मार्ग हा छत्रपती संभाजी नगर नजीक समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. हे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
समृद्धीला जोडला जाणार मार्ग
सध्याचा जो शिरूर छत्रपती संभाजीनगर महामार्ग आहे त्याच्या बहुतांश समांतर ग्रीनफिल्ड मार्ग असणार आहे. पण शिरूर, अहमदनगर, पैठण, बिडकीन, येथून पुढे छत्रपती संभाजी नगरच्या शेंद्रा एमआयडीसी येथे त्याचा शेवट होणार आहे. शेंद्रा एमआयडीसी मार्ग तो समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. एमआयडीसी मधील बिडकीन आणि शेंद्रा या दोन्ही औद्योगिक वसाहतींना हा महामार्ग सोडला जाणार आहे. त्यामुळे औद्योगिक प्रगतीला वाव मिळणार आहे.
7 हजार 515 कोटी रुपये खर्च अपेक्षित
पुणे ते शिरूर हा उन्नत मार्ग सात हजार 515 कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे या प्रकल्पाच्या खर्चाची 70 टक्के रक्कम वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून कर्जाद्वारे तर 30 टक्के रक्कम ही संस्थात्मक कर्जाद्वारे उभारले जाणार आहे. याबाबतची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे.
पुण्यातून केवळ 2 तासांत संभाजीनगर
प्रस्तावित मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि संभाजीनगर या दोंन्ही शहरांमधील अंतर कमी होणार असून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शिवाय हा मार्ग दोन्ही शहरातल्या औद्योगिक, शेती, आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे साहजीकच या दोन्ही शहरातल्या अर्थकारणावर याचा परिणाम होणारआहे.