एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि त्यासोबतच उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमान झपाट्याने वाढणार आहे. अशा वेळी उन्हाच्या झळांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण उन्हाळी सहलीचे नियोजन करत असतात.
शिमला, मनाली किंवा मसूरी यांसारखी प्रसिद्ध हिल स्टेशन्स लोकांच्या पहिल्या पसंतीवर असतात. मात्र, या ठिकाणी वाढत्या गर्दीमुळे शांत आणि निसर्गरम्य सहलीचा आनंद लुटणं अवघड होतं. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी काही ऑफबीट डेस्टिनेशन्स निवडली आहेत. या कमी गर्दीच्या, निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही परिपूर्ण आणि शांततापूर्ण सुट्टी घालवू शकता.
चोपता, उत्तराखंड
जर तुम्हाला भारतातच परदेशासारखं सौंदर्य अनुभवायचं असेल, तर उत्तराखंडमधील चोपता हा सर्वोत्तम पर्याय आहे. “भारताचं मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण हिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. एप्रिलच्या महिन्यात येथे थंड हवामान आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहायला मिळतं.

तोश, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील पार्वती व्हॅलीमध्ये लपलेलं हे छोटंसं गाव स्वच्छ आणि शांततेत वेळ घालवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. येथे गरम पाण्याचे झरे, अप्रतिम पर्वतदृश्य आणि थंडगार हवामान आहे. एप्रिल हा ट्रेकिंगसाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम महिना आहे.
तवांग, अरुणाचल प्रदेश
ईशान्य भारतातील सर्वात सुंदर पण कमी प्रसिद्ध असलेल्या हिल स्टेशन्सपैकी तवांग हे एक ठिकाण आहे. भव्य तवांग मठ आणि तिथून दिसणारे अप्रतिम निसर्गदृश्य पर्यटकांना वेड लावतात. एप्रिलमध्ये तवांगचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.

कौसानी, उत्तराखंड
कौसानी हे उत्तराखंडमधील एक शांत आणि रमणीय ठिकाण आहे, जिथून नंदा देवी, त्रिशूल आणि हिमालयाच्या इतर पर्वतरांगा स्पष्ट दिसतात. एप्रिल महिन्यात येथे आल्हाददायक वातावरण असतं, ज्यामुळे प्रवास अधिक सुखकर होतो.

तीर्थन व्हॅली, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅली ही शांतता, हिरवीगार झाडं आणि स्वच्छ नद्या यांसाठी प्रसिद्ध आहे. एप्रिल महिन्यात येथे रंगीबेरंगी फुलं फुललेली असतात आणि संपूर्ण निसर्ग एक वेगळाच आनंद देतो. हायकिंग आणि ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

मावलिननॉन्ग, मेघालय
मावलिननॉन्ग हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या हिरव्या टेकड्या, स्वच्छ वातावरण आणि प्रसिद्ध “रूट ब्रिज” पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. एप्रिल महिन्यात येथील हवामान एकदम आल्हाददायक असतं.

झिरो, अरुणाचल प्रदेश
झिरो हे अपतानी आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. हिरव्या शेतांमधून वाहणारे छोटे झरे, बांबूंची घरे आणि स्वच्छ हवा हे येथील वैशिष्ट्य आहे. एप्रिलमध्ये येथे ट्रेकिंग, बर्डवॉचिंग आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी उत्तम संधी असते.

जर तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जाण्याऐवजी शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी सुट्टी घालवायची असेल, तर ही 7 ठिकाणं तुमच्यासाठी बेस्ट आहेत. एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून दूर, निसर्गाच्या कुशीत आनंददायी सुट्टीसाठी हे डेस्टिनेशन्स नक्की ट्राय करा!




