Attari-Wagah border :22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे तात्पुरते व्हिसा रद्द केले होते. त्यानंतर भारतात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याची सुविधा नाकारली गेली होती. आता जवळपास आठवड्याभराच्या तणावानंतर पाकिस्तानने अटारी-वाघा सीमाव्दार उघडले असून, भारतातून (Attari-Wagah border) आपल्या नागरिकांची परतफेरी सुरू केली आहे.
व्हिसा रद्द (Attari-Wagah border)
22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने सर्व पाकिस्तानी व्हिसा धारकांना देश सोडण्यास सांगितले होते. अनेक नागरिक खासगी भेटींसाठी, धार्मिक यात्रेसाठी भारतात आले होते, ज्यात अनेक वृद्ध व्यक्तीही होत्या. मात्र, सीमाव्दार अचानक बंद केल्यामुळे ते भारतातच अडकले.
अटारी सीमेजवळ लोकांची गर्दी (Attari-Wagah border)
सीमेवर अडकलेल्या नागरिकांमध्ये सूरज कुमार यांचा समावेश होता, जे आपल्या वृद्ध आईला हरिद्वारच्या तीर्थयात्रेसाठी घेऊन आले होते. त्यांनी सांगितले, “मी ४५ दिवसांच्या व्हिसावर आलो होतो. मात्र १० दिवसांतच परत जाण्याची वेळ आली. गुरुवारी सकाळी अटारीवर पोहोचलो, पण गेट बंद होतं.”
७ दिवसांत ९११ पाकिस्तानी भारतातून गेले
गुरुवारपर्यंत अटारी-वाघा सीमेमार्गे ९११ पाकिस्तानी नागरिक भारतातून परत गेले आहेत. फक्त बुधवारच्याच दिवशी १२५ जणांनी भारत सोडला. याशिवाय १५ भारतीय नागरिक, जे पाकिस्तानी व्हिसावर होते, त्यांनीही पाकिस्तानात प्रवेश केला.
दीर्घकालीन व्हिसाधारकांना भारतात प्रवेश
भारताच्या बाजूनेही काही नागरिकांनी प्रवेश केला आहे. अमृतसर सीमारक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५२ भारतीय आणि ७३ पाकिस्तानी नागरिक, जे दीर्घकालीन भारतीय व्हिसाधारक होते, त्यांनी भारतात प्रवेश केला. यामुळे आतापर्यंत एकूण येणाऱ्या नागरिकांची संख्या १,६१७ भारतीय आणि २२४ पाकिस्तानी इतकी झाली आहे.
सिंधू जल संधीनंतर आण्विक धमकी
भारताने फक्त व्हिसा रद्द केला नाही, तर सिंधू जल संधीलाही तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासोबतच भारताने आपल्या हवाई क्षेत्रातून पाकिस्तानी विमानसेवा बंद केली आणि पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्सवर प्रतिबंध लावले.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्र्यांपैकी एक हनीफ अब्बासी यांनी भारताला थेट आण्विक युद्धाची धमकी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “घोरी, शाहीन, गजनवी यांसारख्या क्षेपणास्त्रांसह १३१ आण्विक हत्यारं भारतासाठीच राखून ठेवली आहेत. जर भारताने पाण्याचा पुरवठा थांबवला, तर पूर्ण युद्धाला तयार राहावं लागेल.”
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. सीमांवरील हालचाली, आण्विक धमक्या आणि दहशतवाद्यांवरील कारवाया पाहता, दोन्ही देश पुन्हा एकदा संघर्षाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहेत. नागरिकांची हालचाल सध्या नियंत्रणात असली, तरी पुढील आठवडे दोन्ही देशांसाठी निर्णायक ठरू शकतात.




