ज्या माणसाच्या शब्दकोषात “अशक्य” नावाचा शब्दच नाही.असा दूर्दम्य इच्छाशक्ती असणारा माणूस म्हणून नेपोलियन बोनापार्टकडे पाहिलं जातं!!
आज आपण जगभर ज्या फ्रेंच राज्यक्रांतीचे दाखले देत असतो. त्या राज्यक्रांतीने राजेशाही नष्ट झाली आणि लोकशाही मूल्ये रुजली. खरं तर ही राज्यक्रांती फसली आणि या फसलेल्या राज्यक्रांतीमुळेच नेपोलियनला बळ मिळाले. एक दिवस त्याने फ्रान्सच्या गादीवर बसून स्वतः चा राज्याभिषेक केला.
नेपोलियनच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जन्माने फ्रेंच नव्हता. फ्रान्सच्या अंकित असणाऱ्या दक्षिणेतील कॉर्सिका बेटावरचा त्याचा जन्म. याच नेपोलियनच्या वडीलांनी आणि कॉर्सिकावासीयांनी फ्रेंचांच्या सत्तेविरोधात लढा दिला.त्याच कॉर्सिकाचा युवक एक दिवस बलाढ्य अशा फ्रान्सच्याच गादीवर बसला.
उंचीने बुटका,ज्याला घोड्यावर नीट मांड टाकता येत नाही, ज्याचा बंदूकीचा निशाणा अचूक नाही मात्र त्याची सैन्यवर भक्कम मांड आहे. त्याचा घोडा ऐन लढाईत सर्वांच्या पुढे असतो अशा नेपोलियनचे सैनिक आपल्या सेनापतीसाठी सूदूर रशियाची मोहीम असो वा इजिप्त,इटलीची मोहीम असो जीवावर उदार होऊन लढत असत.
नेपोलियनच्या वैयक्तिक महत्वकांक्षा प्रचंड असल्या तरी त्याने जनतेसाठी मोठे रस्ते,बागा,अनेक शैक्षणिक संस्था उभारणे अशी लोकोपयोगी कामे केलीच त्याचबरोबर अमिर उमरावांचे वर्चस्व कमी केले.
अशा नेपोलियनचं वैयक्तिक आयुष्यमात्र एका अर्थाने दुःखद होतं. पहिल्या प्रेयसीसाठी त्याने केलेला देशत्याग एकीकडे आणि सत्तेच्या जवळ जाण्यसाठी एका विधवा उमराव स्त्रीशी केलेला विवाह एकीकडे. ज्या नेपोलियनने फ्रान्सला महासत्ता बनवून जगात उभं केलं त्याच नेपोलियनच्या सख्या बहिणीने सत्तेसाठी त्याचा केलेला विश्वासघात एकीकडे. अशा प्रकारे निष्ठा,पराक्रम,महत्वकांक्षा फितुरी,विश्वासघात,प्रेम,विरह अशा रोमांचक गोष्टीने भरलेलं आयुष्य आणि अतिमहत्वकांक्षे पोटी आयुष्याची अखेरची वर्षे इंग्रजांच्या कैदेत सेंट हेलेना बेटावर काढताना खचितस त्याला अशक्य नावाचा शब्द शिवला असेल. त्याच्या मृत्यूनंतर 19 वर्षांनी त्याचं शव फ्रान्सला नेईपर्यंत त्यांच्या कबरीची देखभाल करणाऱ्या एका सैनिकाची निष्ठा उदारहरणा दाखल दिली जाते की त्याच्या सैन्यचा त्याच्यावर किती जीव होता.अशा नेपोलियन बद्दल तो साधा जनरल असताना बोलले जाई कि लवकरच त्याला संपूर्ण सैन्याचा ताबा द्यायला हवा. नाही तर तो स्वतः आपल्या हाताने तो घेईल. अशा महत्वाकांक्षी फ्रेंच नायकाच्या युध्द मोहीमा आशाच अशक्य ,अतर्क्य कोटीतल्या होत्या. त्याच्या लढाईतील सैन्य डावपेचांचा अभ्यास आजही जगभरातील सैनिकी शिक्षण संस्थामधे केला जातो.अशा नायकावर मराठीत लिहलेली ही कादंबरी त्याच्या कर्तृत्वाला न्याय देणारीच! तसेच अतिशय छान गुंतून जावे अशा शैलीत लिहली आहे.
पुस्तक परिचय – प्रणव पाटील
पुस्तकाचे नाव – दिग्विजय
लेखक – भा.द.खेर, राजेन्द्र खेर
मेहता प्रकाशन
किंमत – ४५०/- रुपये फक्त