पाकिस्तानच्या एकात्मतेवर पुन्हा एकदा गंभीर संकट कोसळलं आहे. 1971 मध्ये बांगलादेशच्या रूपाने आधीच एक फाळणी अनुभवलेल्या पाकिस्तानला आता दुसऱ्या तुकड्याचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. बलोचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून धगधगत असलेलं स्वातंत्र्याचं आंदोलन अखेर निर्णायक वळणावर आलं असून, बलोच नेते मीर यार बलोच यांनी थेट स्वतंत्र बलोचिस्तानची औपचारिक घोषणा केली आहे.
बलोचिस्तान पाकिस्तानपासून पूर्णपणे स्वतंत्र?
मीर यार बलोच यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटद्वारे जगभरात खळबळ उडवणारी माहिती दिली आहे. “बलोचिस्तान आता स्वतंत्र राष्ट्र आहे. हा आमच्या जनतेसाठी ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही भारतासारख्या लोकशाही राष्ट्रांकडून समर्थनाची अपेक्षा करतो,” असं त्यांनी जाहीर केलं. त्यांनी भारत सरकारकडे बलोचिस्तानला मान्यता देण्याचं आणि नवी दिल्लीत बलोच दूतावास स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच, संयुक्त राष्ट्रांनी शांतिसेना पाठवून पाकिस्तानी लष्कराला माघार घेण्याचे आदेश द्यावेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
70 वर्षांचा संघर्ष एका निर्णायक टप्प्यावर
बलोचिस्तान हे पाकिस्तानच्या भूगोलात सर्वांत मोठं प्रांत असलं, तरी तिथे सतत अविकास, दडपशाही, आणि शोषण सुरूच राहिलं आहे. इथली खनिज संपत्ती पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची असली तरी त्याचा फायदा बलोच जनतेला मिळत नाही. याच अन्यायातून जन्म झाला बलोच लिबरेशन आर्मीचा (BLA), ज्यांनी 70च्या दशकापासून पाकिस्तानविरोधात सशस्त्र संघर्ष सुरू ठेवला आहे.
बलोच लिबरेशन आर्मीचे हल्ले
गेल्या काही आठवड्यांपासून BLA ने हल्ल्यांचा सपाटा सुरू केला आहे. 9 मेपर्यंत BLA ने तब्बल 39 ठिकाणी हल्ले केल्याचा दावा केला आहे. रिमोट कंट्रोल आयईडी, सततचा गोळीबार आणि पाक लष्कराच्या तळांवर थेट हल्ले, यामुळे इस्लामाबादमध्ये खळबळ उडाली आहे. बलोच आर्मीचा दावा आहे की त्यांनी बलोचिस्तानच्या जवळपास एक तृतीयांश भागावर ताबा मिळवला आहे.
भारताच्या कारवायांनंतर पाकिस्तानचा अंतर्गत गोंधळ वाढतोय?
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला असून, भारताने केलेल्या आक्रमक कारवायांनंतर पाकिस्तानी लष्कर पूर्णत: अलर्टवर आहे. अशातच बलोच आर्मीने पाठपाठ हल्ले करत पाकिस्तानला दुहेरी फटकारा दिलाय. आता केवळ सीमारेषेवरच नव्हे, तर पाकिस्तानच्या आतूनच एक मोठं बंड उभं राहत आहे.
संयुक्त राष्ट्रांकडून हस्तक्षेपाची मागणी
स्वातंत्र्याची घोषणा करताना मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांना आवाहन केलं आहे की त्यांनी या प्रांतात शांतिसेना पाठवून पाक लष्कराच्या दडपशाहीला आळा घालावा. त्याचप्रमाणे, बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पाकिस्तानपुढे नवे संकट
1971 साली बांगलादेशाच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानचा पहिला तुकडा झाला. आता बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर पाकिस्तान पुन्हा तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानच्या तिसऱ्या तुकड्याची ही सुरुवात ठरेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र, बलोच जनतेने जो निर्णय घेतला आहे, तो केवळ पाकिस्तानसाठी नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक नवा अध्याय ठरणार आहे.




