Baramotichi Vihir : विहिरीत बांधलाय गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाचे सातारकरांकडून जतन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baramotichi Vihir) आपल्या देशाला भव्य इतिहास आणि परंपरेचा वारसा लाभलेला आहे. यांपैकी मराठ्यांच्या इतिहासाचे जतन करणाऱ्या महाराष्ट्रात अनेक गड- किल्ले पहायला मिळतात. यामध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू सातारा जिल्ह्यामध्ये जतन करण्यात आल्या आहेत. कारण, पूर्वी सातारा ही ‘मराठ्यांची राजधानी’ म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे या जिल्ह्यातील ऐतिहासिक परंपरा आजही मानाने जतन केल्याचे दिसून येते. अशा या ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेल्या साताऱ्यातील एका गुप्त आणि अद्भुत वास्तूविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

आजपर्यंत तुम्ही अनेक गड, किल्ले, राजवाडे, महाल यांच्या विषयी ऐकलं, वाचलं असेल. (Baramotichi Vihir) पण विहिरीत बांधलेल्या राजवाड्याविषयी तुम्हाला माहित आहे का? ‘मराठ्यांची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील एका गावात एक भव्य विहीर आहे. या विहिरीत मराठ्यांनी एक गुप्त राजवाडा बांधला होता. जो स्वतःतच एक अद्भुत नजराणा आहे. चला तर सातारा जिल्ह्यातील या ऐतिहासिक गुप्त राजवाड्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

कुठे आहे हा गुप्त राजवाडा?

सातारा जिल्ह्यातील शेरी लिंब या गावात ‘बारा मोटेची विहीर’ आहे. ही विहीर सुमारे ३०० वर्ष जुनी असून येथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. दिसायला विहीर वाटणारी ही वास्तू खरंतर एक राजवाडा आहे. मराठ्यांनी आपल्या गुप्त बैठकींसाठी ही विहीर बांधल्याचे सांगितले जाते. अत्यंत रहस्यमयी पद्धतीने या विहिरीमध्ये दुमजली राजवाडा बांधण्यात आला आहे.

बारामोटेची विहीर (Baramotichi Vihir)

साताऱ्यातील ‘बारामोटेची विहीर’ ही अत्यंत वेगळ्या आणि लक्षवेधी पद्धतीने बांधण्यात आली आहे. खरंतर ही विहीर नसून राजवाडा असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. या विहिरीचे संपूर्ण काम हेमाडपंथी पद्धतीने करण्यात आले आहे. विहिरीच्या दगडांमध्ये कोरीव शिल्प पहायला मिळतात. विहिरीत उतरण्यासाठी दगडामध्ये जिना आणि भरवक्कम दरवाजादेखील तयार करण्यात आला आहे. या विहिरीच्या मध्यभागी २ मजली राजवाडा बांधलेला असून त्याला अत्यंत गुप्त पद्धतीने आकार देण्यात आलेला आहे.

कोणी बांधला गुप्त राजवाडा?

इ.स.वी सन १७१९ ते १७२४ या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी विरुबाई यांनी ही ‘बारामोटेची विहीर’ (Baramotichi Vihir) बांधल्याचे सांगितले जाते. ही विहीर मराठ्यांच्या बैठकी पार पाडण्यासाठी गुप्त स्वरूपात बांधण्यात आली होती. या विहिरीची खोली जवळपास १०० फूट खोल आणि ५० फुट रुंद अशी आहे. असं म्हणतात की, या विहीरीचे बांधकाम करतेवेळी या परिसरात ३३० आंब्याची कलमं लावून आमराई तयार करण्यात आली होती. ज्यामुळे अत्यंत गुप्त स्वरूपात या विहिरीत राजवाडा बांधणे शक्य झाले.

मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा गुप्त राजवाडा

साताऱ्यातील ‘बारामोटेची विहीर’ ही १७ व्या शतकातील ऐतिहासिक वारसा आहे. ही विहीर आकाराने अष्टकोनी आणि दिसायला साधारणपणे शिवलिंगाप्रमाणे आहे, असे येथील स्थायिक सांगतात. या विहिरीच्या आतील दुमजली राजवाड्यात जाण्यासाठी दगडांमध्ये भरभक्कम जिना तयार करण्यात आला आहे. (Baramotichi Vihir) हा जिना उतरून खाली महालाच्या तळमजल्यावर पोहोचता येते. तर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी २ चोर वाडे देखील तयार करण्यात आले आहेत. या जिन्याने वर जाताच एका छोटेखानी महालात आपण पोहोचतो. तर विहिरीच्या आत असणाऱ्या मुख्य दरवाजातून गेले असता माणूस थेट छतावर पोहोचतो. जिथे सिंहासन आणि बैठकीची व्यवस्था केल्याचे दिसते.

हा राजवाडा अत्यंत गुप्त पद्धतीने तयार करण्याचे कारण असे की, येथे मराठ्यांची खलबते चालत असत. या विहिरीतील गुप्त राजवाड्यात साताऱ्याचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांच्या अनेक बैठकी तसेच खलबते चालत. शाहू महाराजांसोबतच पेशवे देखील या ठिकाणी गुप्त बैठकीसाठी येत होते. या विहिरीच्या भिंतींवर कोरलेले वाघ आणि सिंह मराठ्यांच्या परक्रमाचे प्रतीक आहेत. एकंदरच ‘बारा मोटेची विहीर’ही मराठ्यांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा एक भरवक्कम पुरावा आहे. (Baramotichi Vihir)