एकीकडे पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताकडून पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत स्ट्राईक करण्यात आला. त्यानंतर भारतात असलेल्या नक्षलवाद विरोधी लढ्याने सुद्धा मोठे यश मिळवले आहे. देशभरातील सुरक्षा यंत्रणांनी तब्बल दोन दशकांपासून पाठलाग करत असलेल्या नक्षली कमांडर बसवराजूला अखेर छत्तीसगडच्या जंगलात यशस्वी कारवाईत ठार करण्यात आलं. या ऐतिहासिक घटनेमुळे माओवादी चळवळीला जबरदस्त हादरा बसला असून, भारताला ‘माओवादीमुक्त’ बनवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडले आहे.
कोण होता बसवराजू ?
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियन्नापेटा गावात १९५५ मध्ये जन्मलेला बसवराजू एका सामान्य शिक्षक कुटुंबातून पुढे आला. त्याने वॉरंगलमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. मात्र, कॉलेजच्या काळात त्याचा ओढा डाव्या विचारसरणीकडे वळला आणि त्याने १९८४ मध्ये M.Tech मध्ये शिक्षण अर्धवट सोडून नक्षल चळवळीत पूर्ण वेळ प्रवेश केला.
जंगलात राहून केल्या अनेक कारवाया
१९८७ मध्ये बसवराजूने श्रीलंकेतील लिट्टे (LTTE) गटाकडून गुरिल्ला युद्धाचे प्रशिक्षण घेतले होते. स्फोटके, जंगल युद्ध आणि छुपे हल्ले यामध्ये तो निष्णात होता. अनेक घातक हल्ल्यांच्या मागे त्याचं डोकं होतं:
२०१० दंतेवाडा हल्ला – ७६ सीआरपीएफ जवानांचे बलिदान
२०१३ झीरम घाटी हल्ला – २७ जण ठार, त्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते महेंद्र कर्मा यांचाही समावेश
२००३ आलेपिरी बॉम्बस्फोट – आंध्रचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर अपयशी हल्ला
२०१८ अराकू खोऱ्यातील आमदार आणि माजी आमदार यांची हत्या
तो विनय, गंगण्णा, प्रकाश, यूमेेश, बी.आर., केशव अशा अनेक टोपणनावांनी ओळखला जात असे. तो जंगलांमध्ये राहून कार्य करत होता आणि अनेक वर्षे सुरक्षा यंत्रणांना चकवण्यात यशस्वी ठरला.
मोठ्या मोहिमेचा यशस्वी टप्पा
२१ एप्रिल ते ११ मे २०२५ दरम्यान चालवलेल्या या २४ दिवसांच्या कारवाईत १,२०० चौरस किलोमीटर परिसरात २१ मोठ्या चकमती घडल्या. चकमती दरम्यान ४५० हून अधिक स्फोटकं सापडली, त्यातील १५चा स्फोट झाला आणि १८ जवान जखमी झाले.
यशस्वी मोहिमा
२१६ नक्षल छुपे ठिकाणे उद्ध्वस्त
३५ पेक्षा अधिक शस्त्रसाठा हस्तगत (यामध्ये स्नायपर रायफल्सही होत्या)
८१८ शेल्स, ८९९ डिटोनेटिंग कॉर्डचे बंडल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
४ तांत्रिक युनिट्स नष्ट – जिथे BGL शेल्स, IED आणि इतर शस्त्रास्त्रांची निर्मिती होत होती
या मोहिमेसाठी हेलिपॅड आणि हिलटॉप बेस कॅम्प उभारण्यात आले होते.
बंडखोरीचा किल्ला पडला
छत्तीसगड-तेलंगणा सीमावर्ती ६० किमी लांब पसरलेली कारेगुट्टालु पर्वतरांग गेल्या २.५ वर्षांपासून माओवाद्यांचा अड्डा बनली होती. येथे सुमारे ३००-३५० सशस्त्र नक्षल कार्यकर्ते वावरत असल्याचे सांगितले जाते. सुरक्षा यंत्रणांच्या मते, हे संपूर्ण क्षेत्र आता नक्षल मुक्त करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना CRPF प्रमुख जी.पी. सिंह यांनी सांगितले की “आजवरची सर्वांत मोठी आणि समन्वयाने राबवलेली नक्षलविरोधी मोहीम” असे म्हटले. छत्तीसगडचे DGP अरुण देव गौतम म्हणाले, “माओवाद्यांची अभेद्य प्रतिमा आता भंगली आहे.” माओवाद्यांचे केंद्रीय समिती सदस्य ‘अभय’ यांनी या कारवाईत २६ नक्षल कार्यकर्ते मारले गेल्याची कबुली दिली आणि शांती चर्चेचे आवाहन केले. पंतप्रधानांनी चर्चेसाठी भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
फक्त बंदुकीने नाही, विकासही सुरू
२०१४ पासून नक्षलविरोधी कारवाया अधिक संगठित झाल्या आहेत. त्याचबरोबर विकासाची चळवळही सुरू आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या ७६ वरून ४२ (२०२४ पर्यंत) वर आली आहे. सुरक्षारक्षकांच्या हौतात्म्यांमध्ये घट होऊन – २०१४ मध्ये ती ८८ वरून २०२४ मध्ये १९ वर आली आहे. आत्मसमर्पण वाढले असून २०२४ मध्ये ९२८, आणि २०२५ च्या पहिल्या चार महिन्यांतच ७००+ वर पोहचले आहे. तर २०२५ मध्ये आतापर्यंत १९७ माओवादी मारले गेले. आतापर्यंत ३२० सुरक्षा छावण्या आणि ६८ हेलिपॅड्स उभारले गेले असून, रस्ते, शाळा आणि मोबाइल नेटवर्क्स आता आदिवासी भागात पोहचू लागले आहेत.
सुरक्षादलांच्या मते, आता माओवादी गट विखुरले गेले असून उर्वरित नेतृत्व फारशा छोट्या भागांत काम करत आहे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणांचे लक्ष्य २०२५ च्या अखेरपर्यंत उर्वरित नेत्यांना ठार मारणे किंवा आत्मसमर्पण घडवून आणणे आहे.छत्तीसगडचे DGP म्हणतात, “ही मोहीम केवळ सामरिक यश नाही, तर मानसिकदृष्ट्याही निर्णायक आहे. माओवादी अजिंक्य आहेत ही समजूत आता मोडीत काढली गेली आहे.”




