सध्या महाराष्ट्र राज्यावर अवकाळी पावसाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात सध्या वातावरणात बदल घडून येत असून ढगाळ हवामान, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे. यामुळे अनेक भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी आधीच नुकसान झालं आहे.
कोणते भाग जास्त प्रभावित होणार ?
हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. याचा अर्थ असा की, या भागांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून कोल्हापूर सांगली आणि सोलापुरात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.धाराशिव (उस्मानाबाद),लातूर,नांदेड या जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भात पावसाबरोबरच तापमानही खूप वाढलेलं आहे.चंद्रपूर,यवतमाळ,वर्धा,या जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसू शकतॊ. तर सिंधुदुर्ग आणि हिंगोली येथे देखील काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडू शकतो.
तापमानाची स्थिती
चंद्रपूर येथे रविवारी तब्बल ४२.६ अंश सेल्सिअस* तापमानाची नोंद झाली. हे तापमान संपूर्ण भारतात त्या दिवशी सर्वात जास्त होतं. संभाजीनगर, नागपूर, वाशिम येथेही तापमान ४१ अंश सेल्सिअस च्या आसपास नोंदवण्यात आलं.या तापमानामुळे हवामान अधिक गरम आणि दमट बनलेलं आहे, जे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण करत आहे.
नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
- शेती करणाऱ्यांनी काढणीस आलेल्या पिकांचं संरक्षण करावं, कारण वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे नुकसान होऊ शकतं.
- आकाशात विजा चमकत असताना उघड्यावर थांबू नये, विशेषतः झाडांखाली किंवा उंच ठिकाणी.
- स्थानिक प्रशासनाच्या सूचना लक्षपूर्वक ऐकाव्यात आणि त्यानुसार कृती करावी.
- शक्य असल्यास, घरातच राहावं आणि सुरक्षितता पाळावी.