परदेशात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शो हाऊसफुल्ल; प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सुधीर फडके संगीत क्षेत्रातील एक मोठे नाव. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व आजही वादातीत आहे. परंतु त्यांचा इथवर पोहोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या हा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. त्यात ट्रेलर पाहून ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली. येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी परदेशात या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत.

परदेशात विक्रमी वेळेत शोज हाऊसफुल

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचे प्रदर्शन अवघ्या काही दिवसांवर आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच भारताबाहेर २४ तासांत या चित्रपटाचे २ शोज ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत. त्यामुळे ‘बाबुजीं’वरील प्रेक्षकांचे प्रेम यातून दिसत आहे. ही बाब या चित्रपटाच्या यशाचा पहिला संकेत आहे असे म्हणायला हरकत नाही. या गोष्टीमुळे चित्रपटाची टीम, कलाकार आणि साहजिकच बाबूजींचे प्रेक्षक प्रचंड आनंदी आहेत.

चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत झळकणार ‘हे’ कलाकार

Swargandharva Sudhir Phadke | Trailer | Sunil B, Adish V, Mrunmayee D | Yogesh D | 1st May 2024

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.

दिग्दर्शकांची प्रतिक्रिया

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, ‘भारताबाहेरून असा प्रतिसाद मिळावा, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.

यावरून ‘बाबुजी’ हे व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रापुरताच किंवा देशापुरताच मर्यादित नसून ते परदेशातही तितकेच सर्वश्रुत आहे. मला खात्री आहे, महाराष्ट्रातही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ला असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल’.