शेअर बाजारातून गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लीने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की बीएसई सेंसेक्स जून 2026 पर्यंत 1 लाख अंकांचा ऐतिहासिक टप्पा गाठू शकतो.
बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेंसेक्स 410.20 अंकांनी म्हणजेच 0.51 टक्क्यांनी वाढून 81,596.63 अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 129.55 अंकांनी म्हणजेच 0.52 टक्क्यांनी वाढून 24,813.45 अंकांवर बंद झाला. या दरम्यान मॉर्गन स्टॅन्लीच्या नव्या अंदाजाने बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये नवीन आशा निर्माण केली आहे.
मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालानुसार, अलीकडील घसरण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम संधी आहे. त्यांच्या बेस केस प्रोजेक्शननुसार जून 2026 पर्यंत सेंसेक्स 89,000 अंकांवर जाऊ शकतो, जे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 8 टक्क्यांनी अधिक आहे.त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे, तेजीतल्या (बुल केस) परिस्थितीत सेंसेक्स 1 लाख अंकांवर पोहोचू शकतो. मॉर्गन स्टॅन्लीचे इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट ऋधम देसाई आणि नयनत पारिख यांनी सांगितले की, जून 2026 साठी आमचा टारगेट 89,000 आहे, जो नव्या उत्पन्न अंदाजावर आधारित आहे. हा टारगेट डिसेंबर 2025 च्या 82,000 च्या अंदाजापेक्षा अधिक आहे.
सेंसेक्स हे 23.5x P/E मल्टिपलवर ट्रेड करेल, जे मागील 25 वर्षांच्या सरासरी 21x पेक्षा जास्त आहे. हे गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाचे प्रतिक आहे.
मॉर्गन स्टॅन्लीने मंदीच्या शक्यतेचाही उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, 20 टक्के शक्यता अशी आहे की जून 2026 पर्यंत सेंसेक्स 70,000 अंकांपर्यंत घसरेल. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे जातील आणि रिझर्व्ह बँकेला कठोर आर्थिक धोरण अवलंबावे लागेल.
त्याशिवाय अमेरिकेत येऊ शकणारी मंदी, जागतिक आर्थिक विकासात संथगती आणि भारतातील उत्पन्न वृद्धीत घट या सुद्धा घटकांमुळे बाजारात घसरण होऊ शकते. अशावेळी इक्विटीचे मूल्यांकनही कमी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच मॉर्गन स्टॅन्लीचा हा अंदाज दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा आहे. बाजारात चढ-उतार सुरूच राहतील, पण 2026 पर्यंत बाजारात मोठा उसळीचा टप्पा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आत्तापासूनच योजना आखायला सुरुवात करावी.