Bird Valley Garden : पुण्यातील ‘या’ उद्यानात दररोज दाखवला जातो लेझर शो; पहायला जमते मोठी गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bird Valley Garden) पुणे तिथे काय उणे.. असे म्हटले जाते ते उगाच का काय! पुण्यात ऐतिहासिक वारसा पासून, खाद्य संस्कृती ते मराठमोळ्या अंदाजापर्यंत विविध पद्धतीचे आकर्षण आहे. त्यामुळे पुणेकर कायम कॉलर ताठ ठेवून असतात. शिवाय पुण्याला शिक्षणाचे माहेरघरसुद्धा म्हटले जाते. दरवर्षी इथे हजारोपेक्षा जास्त विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. तर काही लोक नोकरीसाठीसुद्धा पुण्यात येतात.

पुणेरी पाट्या, पुणेरी मीन्स यांचा तर नादच नाही. अशातच पुण्यातील एका गार्डनचा (Bird Valley Garden) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गार्डनमध्ये नियमित दाखवला जाणारा लेझर शो इथे येणाऱ्या लोकांचे खास आकर्षण आहे.

बर्ड व्हॅली उद्यान (Bird Valley Garden)

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात असलेले हे उद्यान ‘बर्ड व्हॅली’ या नावाने प्रसिद्ध आहे. २००८ साली बर्ड व्हॅली उद्यान सुरू करण्यात आले. या उद्यानाने सुमारे २६ एकर परिसर व्यापला आहे. या उद्यानात एक सुंदर तलाव देखील आहे. ज्यामध्ये विविध सुंदर पक्षी पहायला मिळतात. तसेच या ठिकाणी बोटिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. (Bird Valley Garden) बर्ड व्हॅली उद्यानात प्रवेश घेण्यासाठी प्रति व्यक्ती १० रुपये इतके शुल्क आकारले जाते. हे उद्यान दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते.

लेझर शोचा व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर कायम वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात. ज्यामध्ये सध्या बर्ड व्हॅली गार्डनचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, या गार्डनमध्ये रंगीबिरंगी लेझर शो सुरू आहे. हा लेझर शो म्युझिकल फाउंटेनरवर दाखवला जातो आणि त्यामुळे हा पहायला अधिकच मजा येते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात हा व्हिडिओ चांगलाच यशस्वी ठरतो आहे. सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ilovepune नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला ‘बहरला हा मधुमास’ हे गाणे बॅकग्राऊंडसाठी वापरण्यात आले आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सायंकाळी ७.३० ते ८ वाजेपर्यंत पुण्यातील बर्ड व्हॅलीमध्ये होणारा सुंदर लेझर शो’. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. यावर अनेक पुणेकर आवर्जून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तसेच हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या गार्डनला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.