BIS Certification : ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिल्यानंतर भारत सरकारने आता चीनच्या विरोधातही निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला पाठीशी घालणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. निकृष्ट दर्जाच्या चीनी इलेक्ट्रिक वस्तूंवर बंदी आणण्यासाठी BIS (भारतीय मानक ब्युरो) प्रमाणपत्र अनिवार्य (BIS Certification) करण्यात आले आहे.
BIS प्रमाणपत्राशिवाय विक्रीस बंदी
भारत सरकारने नुकताच एक आदेश जारी केला असून त्यानुसार चीनमधून आयात होणाऱ्या काही खास प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तूंना BIS प्रमाणपत्र असणे बंधनकारक केले गेले आहे. या आदेशात रिक्लायनर, इलेक्ट्रिक टॉयलेट, व्हर्लपूल बाथ, स्पा उपकरणे, कपडे वाळवणारी यंत्रणा, तौलिया गरम करणारी साधने यांचा समावेश आहे.
ही उत्पादने सध्या चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात केली जात असून, त्यांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी DPIIT (उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग) पर्यंत पोहोचल्या होत्या. यामुळे १९ मे रोजी सरकारने BIS प्रमाणपत्राचा आदेश काढला असून, तो १९ मार्च २०२६ पासून लागू होणार आहे.
उद्योग क्षेत्राने व्यक्त केला आनंद
सरकारच्या या निर्णयाचे उद्योग क्षेत्राने स्वागत केले आहे. हा केवळ गुणवत्ता नियंत्रण आदेश (Quality Control Order) नसून देशांतर्गत उत्पादनासाठी नवी दारे उघडणारा मार्ग असल्याचे मानले जात आहे.
BIS प्रमाणपत्र नसलेली उत्पादने आता भारतात विक्रीस पात्र राहणार नाहीत, यामुळे स्थानिक उत्पादकांना स्पर्धात्मक संधी मिळणार आहे. सरकारचा उद्देश असा आहे की, जसे खेळणी, AC आणि बूट यांसारख्या क्षेत्रात देशांतर्गत उत्पादन साखळी निर्माण झाली, तशीच साखळी या इलेक्ट्रिक वस्तूंसाठीही तयार व्हावी.
‘वोकल फॉर लोकल’ला चालना
या निर्णयामुळे भारतातच इलेक्ट्रिक शेवर, हेअर क्लिपर, स्टीम कुकर, मसाजर, हीटिंग पॅड, इलेक्ट्रिक ब्रश, आउटडोअर बार्बेक्यू यांसारख्या छोट्या पण महत्त्वाच्या उपकरणांचे उत्पादन वाढेल. ‘वोकल फॉर लोकल’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला यामुळे आणखी गती मिळणार आहे.
भारताची व्यूहरचना स्पष्ट
यातून स्पष्ट होते की भारत फक्त सीमारेषेवर नव्हे, तर व्यापार धोरणातूनही चीनला उत्तर देण्याची तयारी करत आहे. पाकिस्तानप्रमाणेच चीनलाही त्याच्या आर्थिक किल्ल्यांवर लक्ष केंद्रित करून भारत दबाव टाकणार आहे.




