मानवकेंद्री धर्माचे शिलेदार | पुस्तक परिक्षण #४

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुस्तकाचे नाव – सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा

परिक्षण घनशाम येनगे

पुस्तकाची सुरूवात करताना लेखिकेने इंग्रजीमधील एक वाक्य वापरले आहे. “’we are like islands in the sea, seprate on the surface but connected in the deep’’ या वाक्यातच या पुस्तकाची ओळख आहे. भारतातील विविधतेतील एकतेचे दर्शन दाखवण्यासाठी या वाक्याचा आधार लेखिकेने घेतला आहे. या एकमय व सहिष्णु भारताचा शोध या पुस्तकाच्या पानापानात आढळेल.

भारत हा अनेक जाती, धर्म, वंश, भाषा सामाऊन घेणारा देश आहे. जगातील जवळपास प्रत्येक धर्माचे अस्तित्व भारतात आढळते. या परंपरांकडे पाहिल्यानंतर भारत नावाची ५००० वर्षांची परंपरा लक्षात येते व भारतातील सांस्कृतिक एकात्मतेची ओळख होते. सबा नक्वी या सुप्रसिद्ध पत्रकर्तीने भारतभर फिरून आजवर अज्ञात असलेले सलोख्याचे प्रदेश या पुस्तकाद्वारे सर्वांसमोर आणले आहेत. चहुबाजुंनी धार्मिक कट्टरतेचा रेटा वाढत असताना मानवतेला महत्त्व देणार्‍या अनेक संयुक्त धार्मिक परंपरा सांभाळणार्‍या भारतीयांची ही काहणी आहे.

काय आहे या पुस्तकात? तर पुरीच्या भगवान जगन्नाथाचा मुस्लिम भक्त ‘सालबेग’ याची कहाणी आहे. अयोध्येच्या ‘सुंदरभवन राममंदिराचे’ मुस्लिम व्यवस्थापक ‘अन्सार हुसेन’ यांची कहाणी आहे. पश्‍चिम बंगालमधील ‘सुंदरबन’ परिसरातील ‘बोनबीबीदेवी’ ही काहीशी अज्ञात अशी, मुर्तिपुजा न मानणार्‍या मुस्लिम समाजाची देवी आणि तिचे हिंदु – मुस्लिम भाविक यांची कहाणी आहे. ‘मुहर्रम’ साजरा करणारी आंध्र व तेलंगणातील हिंदु सार्वजनिक मंडळे, सर्वधर्मीयांच्या नवसाला पावणारी तमिळनाडूच्या ‘नागपट्टिनम’ येथील ‘वेलंकणी चर्च’मधील देवी एकाच वास्तुत दर्गा आणि मंदिर असं हिंदु – मुस्लिम धार्मिक परंपरांना सामावुन घेणारं कर्नाटकातील ‘तीनथानी’ येथील देवस्थान ही आणि अशी अनेक उदाहरणं आणि कहाण्या रिपोर्ताज स्वरूपात या पुस्तकात आहेत.

धार्मिक सहिष्णुतेची आणि सहअस्तित्वाची ही उदाहरणे पाहिल्यानंतर आपल्याला भारताचा अभिमान वाटतो. सबा नक्वी यांचे ‘’सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णु भारताचा’’ हे पुस्तक वाचताना प्रकर्षाने लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ६ डिसेम्बर १९९२ आधीचा भारत आणि ६ डिसेम्बर १९९२ नंतरचा भारत यात असणारा सांस्कृतिक फरक. या घटनेने धर्मनिरपेक्ष सहिष्णु भारताचा पाया उखडला जाण्याची प्रक्रिया सुरु झाली. संमिश्र सांस्कृतिक परंपरा असणारे समाज मुलतत्ववादी विचारांकडे ओढले गेले. सूफी आणि भक्ती परंपरांना आव्हान मिळू लागले. दोन समाजामध्ये एक प्रकारची दरी निर्माण केली. याच वेळी आलेल्या उदारीकरण पर्वाने शहरीकरणाला चालना दिली, समाजात सुबत्ता आली पण या आर्थिक स्वावलंबनाने, तंत्रज्ञान प्रगतिमुळे मोकळा वेळ मिळू लागला व एकमेकांवर अवलंबुन असणार्‍या समाजात द्वेष निर्माण झाला. अनेक ठिकाणी मिश्र हिंदू-मुस्लिम संस्कृती चा असणारा प्रभाव शुद्धिकरणाच्या नावाखाली कमी होऊ लागला. या पुस्तकात अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यात धर्माच्या ऐवजी त्या त्या विशिष्ट प्रदेशातील प्रथा, परंपरा, संस्कृती व कृषी-ग्रामीण अर्थव्यवस्था ही जास्त प्रभावी होती. पण आता त्याचा प्रभाव ओसरत चालला आहे. लोकांना आपली धार्मिक ओळख ही जास्त महत्वाची वाटत आहे. बाबरी मशीद-रामजन्मभूमि घटनेचे खुप सुक्ष्म परिणाम झाले आहेत. फाळणी पेक्षाही जास्त नुकसान या घटनेने केले आहे असे माझे मत झाले आहे. दुर्दैवाने या घटनेवर संशोधनात्मक लिखाण फार कमी झाले आहे. आजही फाळणीवर पुस्तके लिहिली जातात पण या गंभीर घटनेवर तसे सोईस्कर मौन पाळले जाते. आनंद पटवर्धन यांच्या ‘राम के नाम’ आणि ‘पिता, पुत्र और धर्मयुद्ध’ या २ डॉक्यूमेंट्री मात्र या प्रश्नांची गुंतागुंत समजावून सांगण्यात यशस्वी ठरल्या आहेत. भारत म्हणजे विरोधभासांचा, एकाच वेळी अनेक विचारधारांचे अस्तित्व मान्य करणारा अन् बरेच गोंधळ सामावून घेणारा देश आहे, कोणतीही गोष्ट इथे पूर्ण सत्य म्हणून पाहता येत नाही. याचा वेध धर्माच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक घेते. मात्र हिंदुत्ववादी राजकारण उभारीला आल्यानंतर म्हणजे धर्माला राजकीय चष्म्यातुन पाहिले जाऊ लागल्याने झालेल्या नुकसानीचा आणि संभाव्य धोक्याचा इशारा देते.

पुस्तकाचे अजुन एक वैशिष्ट म्हणजे इथल्या धर्मनिरपेक्ष लोकपरंपरांचा घेतलेला वेध लोकसंगीत हे राजस्थानचे अभिन्न अंग आहे. या लोकसंगीताचा मुख्य आधार म्हणजे राजस्थानातील ‘लंगा’ आणि ‘मांगणियार’ हे मुस्लिम कलाकार परंतु ते गाणी गातात मात्र प्रामुख्याने हिंदु देव- देवतांची या समाजांसोबतच स्वतः ला अर्जुनाचे वंशज मानणार्‍या राजस्थानातील मुस्लिम ‘मेओ’ समाजाचेही वर्णन या पुस्तकात आढळले हे वाचून सर्व मुस्लिम समाज एकसंध आहे असे मानणार्‍यांचे डोळे नक्कीच उघडतील.

भाषा आणि जात हे दोन घटक धार्मिक अस्मितांना वरचढ ठरले आहेत. अशी दोन उदाहरणे लेखिकेने पुस्तकात सांगीतली आहेत. भाषेचे उदाहरण देताना पश्‍चिम बंगालमधील समाजाचे निरिक्षण करून लेखिकेने निष्कर्ष काढला आहे. की बंगालमधील धार्मिक तणावाचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. याचे कारण देताना लेखिकेने तिथे दिर्घ काळ टिकलेल्या कम्युनिस्ट राजवटीसोबतच तिथल्या धर्मापेक्षा बंगाली भाषेच्या आधारावर बेतलेल्या सांस्कृतिक अस्मितेला जबाबदार धरले आहे. जातीचे उदाहरण सांगताना तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागात असणार्‍या ‘नाडर’ समाजाचे उदाहरण दिले आहे. हा ‘नाडर’ समाज ख्रिश्‍चन आणि हिंदू या दोन्ही धर्मात आढळतो पण एकसंध ‘नाडर’ समाजात धार्मिक भिन्नतेला फारसे स्थान नाही. हिंदू आणि ख्रिश्‍चन नाडर समाजात सर्रास विवाह होतात. एकाच नाडर कुटुंबात हिंदू आणि ख्रिश्‍चन अशा दोन्ही धर्माचे सदस्य असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
हे पुस्तक अशा अनेक सहिष्णू परंपरांची ओळख करून देते आणि परंपरा जपल्या तरच भारत नावाचा देश टिकेल नाही तर धार्मिक कट्टरतेच्या आगीत होरपळून जाईल याची जाणीवही करून देते.

पुस्तकाचे नाव – सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा
लेखिका – सबा नक्वी
अनुवाद – प्रमोद मुजुमदार
प्रकाशक – समकालीन प्रकाशन पुणे
पानांची संख्या – १८४
किंमत – २०० रुपये

Leave a Comment