हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय दूरसंचार कंपनी बीएसएनएलचे (BSNL) ग्राहक खूप दिवसापासून 4G आणि 5G सेवेची वाट पाहत होते. हि सेवा आता 2025 मध्ये सुरू होणार असून , टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. टीसीएसचे मुख्य परिचालन अधिकारी एन. गणपति सुब्रमण्यम यांनी सांगितले की, बीएसएनएलची हाय-स्पीड नेटवर्क सेवा वेळेवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2025 पासून 5G नेटवर्क सुरू –
दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याआधी सांगितले कि , बीएसएनएल 2025 च्या मे महिन्यापर्यंत देशभरात एक लाख ठिकाणी 4G सेवा सुरू करणार आहे. त्याचसोबत जून 2025 पासून 5G नेटवर्कही सुरू होईल. टीसीएस आणि तेजस नेटवर्क्स या भारतीय कंपन्या या प्रकल्पावर काम करत असून, हा पूर्णपणे स्वदेशी नेटवर्क असेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मदत होणार आहे.
सर्व कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण –
टीसीएसने सांगितले आहे की या प्रकल्पाच्या कामात कोणतीही अडचण नाही आणि सर्व कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण केली जातील. कंपनीला 2023 च्या जुलै महिन्यात हा प्रकल्प सोपवण्यात आला होता आणि त्यासाठी 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच आता तो येत्या नवीन वर्षात यशस्वी होईल. त्यामुळे बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी लवकरच 4G आणि 5G सेवांसंबंधी अधिक माहिती देईल. या सेवांमुळे लाखो ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळणार आहे.
प्रकल्पासाठी मजबूत पायाभूत सुविधा तयार –
मोदी सरकारने या सेवांसाठी भारतीय तंत्रज्ञान आणि संसाधनांचा वापर करण्यावर भर दिला आहे. टीसीएस आणि तेजस नेटवर्क्सने या प्रकल्पासाठी मजबूत पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. यामुळे 2025 मध्ये बीएसएनएल 4G आणि 5G सेवा देशभरात यशस्वीपणे सुरू होणार असल्याची अशा वर्तवली जात आहे.