हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2025 – आज 2025 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. यामध्ये त्यांनी 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही असे सांगितले . या घोषणेनंतर, ग्राहकवस्तू आणि एफएमसीजी कंपन्यांचे शेअर्स 5 % पर्यंत वाढले आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे . बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ब्लू स्टार, व्हर्लपूल ऑफ इंडिया, स्विगी, कल्याण ज्वेलर्स, झोमॅटो आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे शेअर्स 5.22 % पर्यंत वाढलेत. त्याचसोबत ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 1054 अंकांनी वाढून 58906 वर पोहोचला आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ (Budget 2025)–
टीडीएस सुधारित मर्यादा 2.4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. यामुळे रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये 9.3% वाढ झाली आहे. प्रेस्टिज इस्टेट्स सारख्या स्टॉक्सचे शेअर्स बीएसई वर 9.3% ने वाढून 1,489.95 रुपयांवर पोहोचले. शोभा लिमिटेडचा शेअर 4.6% ने वाढून 1385 रुपयांवर पोहोचला आहे, तर फिनिक्स मिल्स, डीएलएफ, ओबेरॉय आणि गोदरेज प्रॉपर्टीजचे शेअर्स 1 ते 2 % च्या दरम्यान वाढले आहेत.
कृषी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ –
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Budget 2025) यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यामुळे कृषी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये 9% पर्यंत वाढ झाली आहे. कावेरी सीड्स, जैन इरिगेशन सिस्टम्स, मंगलम सीड्स, जेके अॅग्री जेनेटिक्स, नाथ बायो-जीन्स, धनुका अॅग्रीटेक आणि श्रीओसवाल सीड्स सारख्या कंपन्यांचे शेअर्स वाढले आहेत. तसेच, फर्टिलायझर्स आणि केमिकल्स त्रावणकोर, चंबळ फर्टिलायझर्स, दीपक फर्टिलायझर्स यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सुमारे 4% वाढले आहेत. अर्थसंकल्पीय घोषणांनंतर भारतीय शेअर बाजारात विविध क्षेत्रांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.