Colors Marathi : खोडकर, निरागस इंदूच्या भेटीसाठी प्रेक्षक आतुर; नवी मालिका ‘या’ दिवशी सुरु होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) सालस तरीही खोडकर अशी इंदू कलर्स मराठीच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे. अलीकडेच प्रोमोमधून इंदू प्रेक्षकांच्या भेटीस आली. मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण पाहिले. तिचे मार्मिक प्रश्न मोठ्यामोठ्यांना अचंबित करणारे आहेत. तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू पुऱ्या गावाची म्हणजेच विठूच्या वाडीची लाडकी आहे. लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच ‘इंद्रायणी’ आपल्या भेटीला येणार आहे.

कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रायणी’ या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वी मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि आरती केली. या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळखही करून देण्यात आली. ‘इंदू’ कोण आहे? तिचे आई वडील कोण आहेत? तिचे जग कसे आहे? (Colors Marathi) हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ‘इंदू’ची भूमिका साकारणारी सांची भोईर, अनिता दाते, संदीप पाठक स्वानंद बर्वे, आयुष उलगड्डे, राघव घाडगे यांच्यासह दिग्दर्शक विनोद लव्हेकर उपस्थित होते.

नवी मालिका ‘इंद्रायणी’ (Colors Marathi)

‘इंद्रायणी’ ही मालिका येत्या २५ मार्च २०२४ पासून सायंकाळी ७ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेबद्दल बोलताना दिग्दर्शक विनोद लव्हेकर म्हणाले, ‘मला फार आनंद आहे की, पुण्यनगरीत आणि तेही विठ्ठल रखुमाई मंदिरासारख्या पावन ठिकाणी आमच्या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार कमाल आहेत. परंतु विशेष कौतुक आहे ते बालकलाकारांचे. त्यांच्यातील निरागसता, समजूतदारपणा वाखाणण्याजोगा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे बालकलाकार या मालिकेतून प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकतील’.

याशिवाय कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणाले, ‘इंद्रायणी’ ही खऱ्याखुऱ्या माणसांची आपल्या मातीतली… आपल्या मातीचा खरा सुगंध घेऊन आलेली कथा आहे. जी रसिकांना निश्चितच भिडेल. मालिकाविश्वात आपलं वेगळेपण इंद्रायणी नक्कीच सिद्ध करेल, याची आम्हाला खात्री आहे’. (Colors Marathi) तर कलर्सच्या रिजनल क्लस्टर हेड सुषमा राजेश म्हणाल्या की, ‘प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार असून त्याच पद्धतीचं रिअलिस्टिक स्टोरी टेलिंग आमच्या मालिका करताना दिसतील’.

दमदार कलाकार

‘इंद्रायणी’ मालिकेत इंदूची भूमिका करणारी बाल कलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देत आहेत. या दोन तगड्या कलाकारांबरोबर ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. (Colors Marathi) चिन्मय मांडलेकर लिखित या मालिकेची निर्मिती ‘जीव झाला येडापिसा’, ‘राजारानीची गं जोडी’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणारे पोतडी एंटरटेनमेंट करत आहे.